शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आरोप
मुंबई – शिवसेनेकडून मुख्यमंत्री किंवा भाजपवर होणारे टीकास्त्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. नाणार प्रकल्पावरून जोरदार वादावादी झाल्यानंतर याच नाणारसाठी मुख्यमंत्री फितूर झाले असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही अखेर पिचक्या पाठकण्याचेच निघाले. नाणार प्रकल्प लादणार नाही, असे त्यांनी सांगितले असतानाही हा प्रकल्प लागला गेला. मात्र शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे ठाम मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
ठाकरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नाणारसारखा विनाशकारी प्रकल्प लादणार नाही. स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प कोकणच्या भूमीत येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्दास दिल्लीत किंमत नाही. ते फितूर झाले आहेत. विकासाच्या नावाखाली कोकणचे वैभव मारू नका, तेथील आंबा, बांबूची वने नष्ट होतील. नसर्ग मारून कोकणची राखरांगोळी करू नका, हे खुद्द मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेत आले आणि त्यांनीही ते मान्य केले. मात्र तरीही नाणारचा घाट घातला जात आहे. शिवसेना त्यास विरोध करेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.