नाणार प्रकल्पाच्या बाजूने होते शिवसेना नेते!

0
सुरुवातीला झालेल्या पाच बैठकांमध्ये शिवसेना नेते सहभागी!
माजी आमदार प्रमोद जठार यांचा गौप्यस्फोट
मुंबई: नाणार रिफायनरी प्रकल्पाला सद्यस्थितीत शिवसेनेकडून जोरदार विरोध केला जात आहे. मात्र आज जे शिवसेना नेते नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करतायत ते नेते सुरुवातीला या प्रकल्पाच्या बाजूने होते. या रिफायनरी प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकांमध्ये हे नेते सहभागी होते, असा गौप्यस्फोट गुरुवारी सिंधुदुर्गमधील भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला. शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी हे शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांसोबतच्या एक, दोन नव्हे तब्बल पाच बैठकांना उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी या सर्वांची भूमिका प्रकल्पाला पूरक होती, असे जठार यांनी आज स्पष्ट केले. जठार यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत गुरुवारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजयदुर्ग बंदराची नैसर्गिक खोली तब्बल 19 मीटर असल्याने हे भारतातील बारावे मोठे बंदर ठरू शकते, असे सांगून या अनुकूलतेमुळेच नाणार रिफायनरी प्रकल्प या परिसरात येत आहे, अशी माहिती जठार यांनी दिली. नितीन गडकरी जहाज उद्योग मंत्री असताना आपण त्यांना ही माहिती दिली असता त्यांनी मला पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना भेटायला सांगितले. त्यानंतर ही रिफायनरी नाणार परिसरात येण्याचे नक्की झाले, असे सांगून ही रिफायनरी आणण्यात आपला सिंहाचा वाटा असल्याचे स्वतःच सांगितले.
नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे या परिसरातच नव्हे पूर्ण कोकणातच रोजगारांची गंगा येणार असल्याचे जठार म्हणाले. पण हे सांगतांना जठार यांनी प्रचंड थापेबाजी केली. नाणार परिसर उजाड असून या पंचक्रोशीत अत्यंत कमी फळबागा असून ज्या आंबा व काजू बागा आहेत त्यापासूनही काहीच उत्पन्न मिळत नसल्याची लोणकढी थाप यावेळी त्यांनी मारली. काजू कारखाने तर तोट्यात असून पन्नास टक्के कारखाने बंद झालेत, अशीही थाप त्यांनी मारली. मी कधीच आमदार झालो नाही तरी चालेल तरी ही रिफायनरी करणारच, असेही ते शेवटी म्हणाले. जैतापूरच्या औष्णिक प्रकल्पाच्या बाजूने असणारे नारायण राणे व त्यांचा पक्ष या रिफायनरीला का विरोध करत आहेत, हे अगम्य कोडंच असल्याचे ते म्हणाले.