नाणार रिफायनरी प्रकल्प भाजपने आणला!

0

भाजप जिल्हाध्यक्ष जठारांची कबुलीने फडणवीस, राणे तोंडघशी

मुंबई : राजापूरच्या नाणार परिसरातील प्रस्तावित वादग्रत रिफायनरी प्रकल्पामधून राजकीय वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. मुख्यमंत्री फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री राणे यांनी हा प्रकल्प शिवसेनेनेच आणला, अशी आरोळी ठोकली असताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी मात्र भाजपनेच हा प्रकल्प आणला असून ताकाला जाऊन भांडे लपवणारे आम्ही नाही, असे सांगत फडणवीस आणि राणे यांनाच तोंडघशी पाडले आहे. जठार यांनी भाजपने रिफायनरी प्रकल्प आणल्याची जाहीर कबुली दिली. हा प्रकल्प रोजगार निर्मितीचे मोठे साधन होऊ शकते म्हणून राज्य भाजपने केंद्राच्या मदतीने हा प्रकल्प राजपुरला उभारण्याचे ठरवले आहे. रोजगाराबरोबर या ठिकाणी अद्यावत हॉस्पिटलही बांधले जाणार आहे.

या प्रकल्पामुळे राजापूर आणि देवगड परिसरातील 16 गावांचे विस्थापन होणार असून फळबागा आणि मासेमारीवरही मोठा विपरीत परिणाम होणार असल्याची भीती पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे या सर्व गावांतील लोकांनी ग्रामसभांच्या माध्यमातून प्रकल्पाला मोठा विरोध केला असून आंदोलने, उपोषण, सभा घेऊन गेले अनेक महिने त्यांनी विरोधाची धार तेज केली आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत आणि अनंत गीते यांनी हा प्रकल्प आणण्यासाठी पुढाकार घेतला, असा आरोप फडणवीस तसेच राणे यांनी केला होता. आधी प्रकल्प आणायचा, मग आपण लोकांच्या बाजूने उभे आहोत, असे सांगायचे आणि नंतर हळूच मागच्या दाराने प्रकल्पाला सताड दारे उघडून द्यायची, असा शिवसेनेचा इतिहास असून येथेही ते हीच लबाडी करत असल्याची टीका फडणावीस आणि राणेंनी केली होती. मात्र आता जठार यांच्या कबुलीमुळॆ भाजपच रिफायनरीचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.