आमदार आशिष देशमुख यांची मागणी
मुंबई:– रत्नागिरीच्या नाणार येथील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सला शिवसेनेचा विरोध आहे. या प्रकल्पासंबंधी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी नाणार येथे जाहीर सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी माझ्या नावाचा उल्लेख करून हा प्रकल्प विदर्भात हालवा अशी मागणी केलेली असल्यामुळे हा प्रकल्प विदर्भात आणावा अशी मागणी भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी मंत्रालयात आयोजित पत्र परिषदेत केली आहे. रिफायनरी आणि पेट्रोकेमिकलचा प्रकल्प विदर्भात येण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून माननीय मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व हा प्रकल्प विदर्भात लवकरात लवकर आणावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
हे देखील वाचा
रत्नागिरीच्या नाणार येथील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सला शिवसेनेचा विरोध असून हा प्रकल्प विदर्भाच्या काटोल मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीत हलवा, अशी मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे ८ मार्च २०१८ ला एक निवेदन देऊन केली आहे. औद्योगिक विकासासाठी काटोल तालुक्यातील १५ हजार एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रस्तावित केली आहे. जागेच्या आसपास पाण्याचे साठे, विजेचे जाळे व जंगलेसुद्धा आहेत. सर्व पायाभूत सुविधा असून काटोल शहर रेल्वेने जोडले आहे. काटोल हे नागपूरपासून जवळ आहे. त्यामुळे काटोल रिफायनरीसाठी सर्वोत्तम जागा असल्याचेही मी मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
पानिपत, भटिंडा, दिल्ली, बिना, गोवाहाटी, इत्यादी ठिकाणी इनलँड रिफायनरी प्रकल्प आहेत. राज्य शासनातर्फे नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाची निर्मिती केल्या जात आहे. याच मार्गावर पेट्रोल वहन करणारी नागपूर ते मुंबई वाहिनी टाकल्यास क्रूड ऑईल विदर्भात येऊ शकते. सिमेंटसाठी लागणारा पेटकोक, सिंथेटिक यार्न व डांबर निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल या प्रकल्पातून उपलब्ध होत असतो. ९० हजार कोटीच्या या प्रकल्पातून विदर्भातील २० ते २२ हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार व ४० ते ४५ हजार युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असेही आमदार डॉ. देशमुख यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना व विधीमंडळाच्या अधिवेशनात सांगितले होते. शासनाने विदर्भात मोठे उद्योगधंदे आणून रोजगार निर्मिती करावी व विदर्भीय युवकांचे भविष्य उज्ज्वल करावे, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.
औद्योगिक विकास व रोजगारासाठी अनेक वर्षांपासून विदर्भ संघर्ष करीत आहे. रिफायनरीच्या निमित्याने विदर्भात रोजगार उपलब्ध होईल व युवकांचे नोकरीसाठी होणारे स्थलांतर थांबेल. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळेल तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर अंकुश बसेल. परिसरातील व लगतच्या राज्यातील पेट्रोलियम पदार्थांच्या किमती जवळपास तीन रुपयांनी कमी होतील. सोबत विदर्भाचा औद्योगिक विकास होईल, असे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी म्हटले.