जुन्नर । पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले जुन्नरच्या दिशेने वळतात. दर्या खोर्यातून व डोंगररांगातून फेसाळणारे धबधबे, पश्चिम घाटातील मनाला भावणारी रानफुले असे निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. पावसाळी पर्यटनासाठी जिल्ह्यातील तसेच मुंबई, अहमदनगरसह अनेक ठिकठिकाणाहून पर्यटक पश्चिम आदिवासी भागातील नाणेघाट परिसरात येत आहेत. पर्यटकांच्या गर्दीने नाणेघाट व दार्याघाट फुलल्याचे चित्र पाहायला मिळते. शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी तर पर्यटक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावतात.
सुट्टीच्यादिवशी गर्दी
2000 वर्षांच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार म्हणून देखील जुन्नर तालुक्याची वेगळी ओळख आहे. निसर्गसौंदर्याचे भांडार असलेल्या जुन्नर तालुक्यामध्ये 9 किल्ले, 5 धरणे, नाणे घाट, प्राचीन लेण्या यांच्यासह धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे आहेत. याबरोबरच दार्याघाट, नाणेघाट, माळशेज घाट, दुर्गाडी परिसर यांनी जुन्नरच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. या अविस्मरणीय निसर्गाची अनुभती घेण्यासाठी पयर्टकांनी शनिवार, रविवारी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने जुन्नर ते नाणेघाट रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. नाणेघाटातील पर्यटकांची लक्षणीय गर्दी पाहता नाणेघाटात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खुद्द जुन्नरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके, उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांसह पोलीस कर्मचारी ठाण मांडून बसल्याचे चित्र होते. तर नाणेघाट येथे असणार्या पोलीस बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी व पर्यटकांच्या अडचणी, समस्या व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते व उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांनी भेट दिली.
विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज
दरवर्षी येथे मोठी गर्दी होते. मात्र, या पर्यटन क्षेत्रांचा अद्यापही दर्जेदार विकास झालेला नाही. काही पर्यटन क्षेत्रांकडे जाण्यासाठी अद्यापही चांगल्या दर्जाचे रस्ते नसल्याने ही पर्यटनस्थळे दुर्लक्षितच राहिली आहेत. तर रस्ते, वीज, मोबाईल रेंज या मूलभूत सुविधा समाधानकारक नसल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधींनी जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याद्वारे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी मदत होईल, अशी आशा या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.