पिंपरी-चिंचवड : पिंपळेगुरव येथे पाणी पिण्याच्या बहाण्याने 14 वर्षीय मुलीवर नातेवाईकानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 48 वर्षीय नातेवाईकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही इयत्ता 9 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आपल्या आईसह ती वडिलांपासून वेगळे राहते. गेल्या जुलै महिन्यापासून आरोपी नातेवाईक हा वारंवार पीडित मुलीचा विनयभंग करीत होता. परंतू, गुरूवारी नातेवाईकाने घरात कोणी नसताना मुलीला पाणी मागण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडला आणि लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी कोणाला काही सांगितले तर तुझ्या आईसह तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही त्याने या मुलीला दिली. त्यामुळे ही मुलगी घाबरून गेली होती. वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून तिने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर ही बाब उघडकीस आली. सांगवी पोलिस तपास करत आहेत.