नाथाभाऊंचा आशिर्वाद कुणाला?

0

भुसावळ : नगरपालिका निवडणूकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाचे रमण भोळे विजयी झाल्यानंतर गटनेतेपदासाठी भाजपाकडून अपक्ष नगरसेवकांच्या नावाची निश्‍चिती झाल्यामुळे आता उपनगराध्यक्षासह स्विकृत सदस्य निवडीकडे लक्ष लागून आहे. हि निवडणूक माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या नेतृत्वाखाली लढली गेल्याने शेवटी नाथाभाऊंचा आर्शिवाद कुणाला मिळतो. त्याचीच उपनगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. पालिकेत भाजपचे सर्वाधिक म्हणजे 25 तर जनआधार विकास पार्टीचे 19 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे स्विकृत सदस्यांची संख्या देखील भाजपाची जास्त राहिल यासाठी मुस्लीम, दलीतांसह इतर समाजाला जवळ करण्याच्या दृष्टीने निवड केली जाणार असल्याचे दिसून येते. यामध्ये युवराज लोणारींना दोन वर्ष तर निर्मल कोठारी, मुन्ना तेली व लक्ष्मी मकासरे यांना प्रत्येक एक वर्षासाठी संधी मिळू शकते.

निवडणूकीतील आश्‍वासनांची पुर्तता करावी लागणार
अत्यंत चुरशीच्या झालेल्या पालिका निवडणूकीत जनाधार पार्टीच्या सचिन चौधरी यांना नमवित भाजपाचे रमण भोळे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी विजयश्री खेचून आणली. यामध्ये शहरातील मतदारांनी भाजपाला एकहाती सत्ता देऊन नगराध्यक्षासह सर्वाधिक नगरसेवक भाजपाचे निवडून दिले आहेत. येत्या 16 डिसेंबरला पालिकेचा कार्यकाळ संपत असून 26 डिसेंबरला रमण भोळे हे नगराध्यक्षपदाची शपथ देऊन पदग्रहण करतील. त्यामुळे आता निवडणूकीत केलेली मदत व दिलेल्या आश्‍वासनांनुसार उपनगराध्यक्षपदासह गटनेता व स्विकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते.

लोणारींना संधी?
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करुन कमळावर निवडणूक लढविणार्‍या युवराज लोणारी यांनी देखील भाजपाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भुमिका पार पाडली. तसेच त्यांचा अनुभव लक्षात घेता उपनगराध्यक्ष पदासाठी लोणारी यांनाच प्रथम संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले असल्याचे समजते. त्यानंतर निर्मल कोठारी यांनी देखील आपल्या प्रभागातून रमण भोळे यांना चांगली मते मिळवून दिली तर दलीत व मुस्लीमांना आपुल्याकडे ओढण्यासाठी मकासरे व मुन्ना तेली यांच्या नावाची चर्चा आहे.

मुस्लीम चेहर्‍याला प्राधान्य
नगरपालिकेची सुत्रे नगराध्यक्ष रमण भोळे या महिना अखेर स्विकारणार आहेत. त्या अनुषंगाने गटनेता निवडीचे आणि गट नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये मुस्लीम बहुल भागातून भाजपा पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार अपक्ष उमेदवारी लढविलेले हाजी मुन्ना तेली यांना संधी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. लवकरच जिल्हाधिकार्‍यांकडे ही नोंद केली जाणार आहे. त्यामुळे भाजपाचे पालिकेतील गटनेते हाजी मुन्ना तेली हे राहणार असल्याचे समजते. यामुळे भाजप मुस्लीमांना न डावलता त्यांना देखील प्राधान्य दिल्याचे दर्शवून शकते. तर जनाधार विकास पार्टीतर्फे गटनेता कोण याची चाचपणी सुरू झाली आहे. पालिका निवडणूकीत 19 जागा जनाधार विकास पार्टीने जिंकल्या आहेत. मात्र सत्तेची संधी हुकल्याने सत्ताधार्‍यांना पालिकेत घेरुन जेरीस आणण्यासाठी अभ्यासू व आक्रमक चेहर्‍याला संधी दिली जाणार असल्याचे समजते.

भाजपातर्फे व्यावसायिक, डॉक्टरांना संधी
भाजपातर्फे स्विकृत नगरसेवक पदासाठी बांधकाम व्यवसायिक चंद्रशेखर अत्तरदे यांचे नाव निश्चीत असून उर्वरीत दोन जागांसाठी मनोज बियाणी, प्रा.डॉ. सुनिल नेवे, डॉ.नि.तू. पाटील, दिपक धांडे व राजेंद्र आवटे यांची नावे चर्चेत आहेत. स्विकृत पदासाठी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, सामाजिक किंवा शैक्षणिक संस्थांच्या संचालकांना संधी देण्यात यावी असे निकष आहेत. त्यामुळे भाजपमध्ये यातील सर्व वर्गातील नगरसेवक आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थाचालक म्हणून मनोज बियाणी, तर डॉक्टर वर्गातील व्यक्तीच नसल्यामुळे जिल्हा वैद्यकिय आघाडीचे कार्यकारिणी सदस्य डॉ. नि.तु. पाटील यांनाच संधी मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. शिवाय डॉ. पाटील हे निवडणूकीसाठी तिकीटाची मागणी केली होती मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नव्हती. ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही अशांनी अपक्ष उमेदवारी लढवून पक्षाविरोधात उघडपणे बंडखोरी केली होती. परंतु डॉ. पाटील यांनी कुठलीही मागणी न करता पक्षाच्या उमेदवारांना मदत केली. त्यांनी याअगोदर पक्षाची विविध जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे या सर्व बाजूंचा विचार करता त्यांची स्विकृत नगरसेवकपदी वर्णी लागणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे.

जनाधारकडून स्विकृत नगरसेवकासाठी चुरस
जनाधार आघाडीतर्फे चौधरी परिसरावातील सदस्य म्हणून सचिन चौधरी यांना पालिकेत एन्ट्री मिळणार असल्यामुळे त्यांचे नाव निश्‍चित असले तरी एका जागेसाठी मुस्लीम समाजाचा चेहरा म्हणून माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी तसेच लेवा समाजाला प्राधान्य देण्याची शक्यता असून प्रा. धिरज पाटील यांना संधी मिळू शकते. गेल्या पंचवार्षिकमध्ये शेवटच्या कालखंडात डॉ.निलेश महाजन, प्रा.जयेंद्र लेकूरवाळे, अ‍ॅड.नरेंद्र लोखंडे यांची स्विकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली होती. त्याच धर्तीवर हि निवड केली जाणार असल्याचे समजते. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या जनाधार पार्टीला पालिका निवडणूकीत मुस्लीम व दलीत भागातून मतदानाची टक्केवारी चांगली राहिली मात्र लेवा पाटीदार बहुल भागात कमी मतदान झाले असल्याने लेवा समाजातील मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी पुढील वाटचालीच्या दृष्टीने लेवा पाटीदार समाजातील सुशिक्षीत उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याद्वारे माजी आमदार चौधरी हे आपली लेवा समाजात छाप पाडण्याचा प्रयत्न करु शकतात.

विषय समिती सभापती निवडीत धक्कातंत्र
उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवक निर्मल कोठारी, युवराज लोणारी, लक्ष्मी मकासरेे यांची नावे चर्चेत आहे. उपनगराध्यक्ष निवडीसोबत विविध समित्यांचे सभापती निवडले जाणार आहेत. सभापती पदांसाठी नगरसेवक निर्मल कोठारी, प्रमोद नेमाडे, किरण कोलते, रमेश नागरणी, रविंद्र खरात, नगरसेविका सविता मकासरे, पुष्पा बत्रा, मंगला आवटे यांची नावे आघाडीवर आहेत. धक्कातंत्र वापरून अपक्ष नगरसेवकांची सुध्दा सभापती पदासाठी निवड होवू शकते.