मुंबई (निलेश झालटे):- गेल्या हिवाळी अधिवेशनापासून सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या नाराजीचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. मागील दोन अधिवेशनापासून सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी नाथाभाऊंनी सोडलेली नाही. विशेष म्हणजे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्यासाठी विरोधकांकडून अजित पवार वेळोवेळी सरसावताना दिसत आहेत. सरकारला अडचणीत आणणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उपप्रश्न विचारुन खडसे सरकारला खडे बोल सुनावत असल्याचे चित्र आहे.
मंत्रिमंडळात येण्याबाबत स्वतःच नकारात्मक असलेल्या नाथाभाऊंच्या या आक्रमकपणामुळे त्यांची भूमिका काय असले हे मात्र बघण्याजोगे आहे. बुधवारी याचा जोरदार प्रत्यय विधासभेत आलाच. जनावरांच्या लाळ्या खुरकत रोगावरच्या लसीसंदर्भातील विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नात सरकार चांगलेच अडचणीत सापडले असून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा घणाघात सुरु झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्यासोबतचा मागील अधिवेशनासारखा स्नेह पुन्हा जुळून आलाच. ‘मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याऱ्या अवलादी इथं आहेत. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी कोण करणार? तशी चौकशी करूच शकत नाही. नाथाभाऊ तुम्हीच सांगा कोण करणार चौकशी?’ असे अजित पवार यांनी विचारले असता त्यावर खडसे यांनी तात्काळ ‘झोटिंगना नेमा!’ असे उत्तर दिल्याने विधानसभेत एकच हास्याची लहर उमटली. यावेळी खडसे यांनी सरकारला धारेवर धरत, सचिव आयुक्तांचे ऐकत नाही असे मंत्री सांगतात. मुख्यमंत्र्यांनी मागील अधिवेशनात सांगूनही जर काम होत नसेल, तर राज्यात अधिकारी कुणाचं ऐकतात, अशा शब्दात संताप व्यक्त केला.
गेल्या अधिवेशनात पंकजा मुंडे यांना सत्तेत आलो म्हणून जबाबदारी विसरायची नसते असे खडसावत त्यांनी रोजगार हमीच्या प्रश्नावरून समज दिली होती. तर सध्याचे दोन नंबरचे मंत्री चंद्रकांत दादांना देखील टोल च्या प्रश्नावरून कोंडीत पकडले होते. निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी बोलताना हाफकिन बंद करण्याच्या मुद्द्यावरून गिरीश बापट यांना घेरले. शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणात देखील त्यांनी बापटांना चांगलेच धारेवर धरले होते. नाथाभाऊंची ही नाराजी बऱ्याचदा उघड झाली आहे. मात्र पक्षासाठी त्यांनी जीवाचे रान केले असल्याने त्यांना पक्ष सोडवत नाहीये. नाथाभाऊंची ही नाराजी सध्या तरी सरकारला चांगलीच महागात पडत आहेत. त्यांच्या या नाराजीचा मोठा स्फोट झाल्यास आश्चर्य वाटू नये. विशेष म्हणजे सभागृहात नाथाभाऊ नाराजी व्यक्त करत असताना विरोधी पक्षाकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद सरकारला जास्त अडचणीत आणणारा ठरत आहे. त्यातही खासकरून अजित पवार यांच्याकडून वेळोवेळी त्यांच्या भूमिकेचे केले जाणारे स्वागत अचंबित करणारेच आहे.