नाथाभाऊंचे वाढते वार मंत्र्यांना सोसवेनात!

0

मंत्रिपद गेल्यापासून मागील काही अधिवेशनापासून सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या नाराजीचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. या अधिवेशनात देखील सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी नाथाभाऊंनी सोडलेली नाही. विशेष म्हणजे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्यासाठी विरोधक वेळोवेळी सरसावताना दिसत आहेत. सरकारला अडचणीत आणणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उपप्रश्न विचारुन खडसे सरकारला खडे बोल सुनावत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य असलेले खडसे चांगलेच झोपून काढत असल्याने सरकारच्या चिंतेत भर पडत आहे. नाथाभाऊंच्या या आक्रमक भूमिकेवरून त्यांना स्वतःला मंत्रिमंडळात येण्याच्या आशा धूसर दिसू लागल्या असल्याचे अधोरेखित होत आहे. दुसरीकडे बोचरे सवाल करत प्रत्येक मंत्र्याला तोंडघशी पाडत आहेत.

या अधिवेशनात सुरुवातीपासून नाथाभाऊ आक्रमक झालेले दिसून येत आहेत. आजही त्यांनी अर्थसंकल्पाच्या विभागवार चर्चेत सरकारला विभागवार झापुन काढले. अल्पसंख्याक विभागाचे सरकारकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करत त्यांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला. हे सरकार अल्पसंख्यांकांच्या विरोधात आहे की काय असा प्रश्न पडतो असे म्हणत त्यांच्यासाठी निधी द्यायचा नसेल तर त्यांना किमान आशेवर तर ठेवू नका असा हल्ला खडसे यांनी चढवला. सरकारच्या जलयुक्त शिवार आणि पर्यटन विभागावर त्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. अल्पसंख्याक विभागाच्या संदर्भात बोलताना त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल ते बोलले. निधीसाठी मी सगळीकडे फिरलो मात्र निधी मिळत नाही. यांच्या मनात अल्पसंख्याकांसाठी काय भावना आहेत हे ओळखू येतेय, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांच्यासाठी निधी द्यायचा नसेल तर तसे स्पष्ट सांगा मात्र उगाच आशेवर ठेवायचं बंद करा असे म्हणत खडसे यांनी धारेवर धरले.

त्यांच्या या बोलण्यात आपण विरोधात असताना जी भूमिका घ्यायचो ती आता सत्तेत असताना का घेत नाहीत हा रेटा जास्त सरकारला अडचणीत आणतो. असो, नाथाभाऊंची ही नाराजी बऱ्याचदा उघड झाली आहे. मात्र पक्षासाठी त्यांनी जीवाचे रान केले असल्याने त्यांना पक्ष सोडवत नाहीये. नाथाभाऊंची ही नाराजी सध्या तरी सरकारला चांगलीच महागात पडत आहेत. त्यांच्या या नाराजीचा मोठा स्फोट झाल्यास आश्चर्य वाटू नये. विशेष म्हणजे सभागृहात नाथाभाऊ नाराजी व्यक्त करत असताना विरोधी पक्षाकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद सरकारला जास्त अडचणीत आणणारा ठरत आहे. नाथाभाऊंच्या या नाराजीचा स्फोट होऊन त्यांचा पक्षबदल तूर्तास तरी अशक्य वाटत असला तरी त्यांच्याकडून वेळोवेळी मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांच्या परफेक्ट राजकारणी म्हणून जरी योग्य वाटत असला तरी त्यांचं राजकीय भविष्य काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र फक्त नाथाभाऊच देऊ शकतात.

-निलेश झालटे