नाथाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली तयार रक्षा खडसेंचा अर्ज बाद होतोच कसा?

राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचा सवाल

जळगाव – जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या खा. रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज तांत्रिक कारणास्तव निवडणूक निर्णयाधिकार्‍यांनी बाद ठरविला. दरम्यान नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या खा. रक्षा खडसेंचा अर्ज बाद होतोच कसा? असा सवाल राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी उपस्थित करून राजकीय गोंधळ उडविला आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच उमेदवारी अर्जांवरून जिल्ह्यात चांगलेच राजकीय घमासान सुरू आहे. या निवडणूकीसाठी भाजपाच्या खा. रक्षा खडसे यांनी इतर मागासवर्गीय आणि महिला राखीव या दोन्ही मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. छाननीच्या प्रक्रियेत मात्र हे दोन्ही अर्ज तांत्रिक कारणास्तव निवडणूक निर्णयाधिकार्‍यांनी बाद ठरविले. त्यावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी असे सांगितले की, खा. रक्षाताईंचा अर्ज तपासून घेतला होता. मात्र तो सत्तेचा गैरवापर करून तो बदलविण्यात आल्याचा आरोप आ. भोळेंनी केला. या आरोपाला राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिलेले प्रत्युत्तर अनेकांच्या भुवया उंचावणारे आहे. आज पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदे बोलतांना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील म्हणाले की, खा. रक्षाताई ह्या दोन वेळा खासदार झाल्या आहेत. त्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या आहेत. राजकीय अनुभव असतांनाही त्यांचा अर्ज बाद होतोच कसा? असा सवाल उपस्थित करून राजकीय गोंधळ उडवून दिला आहे. दरम्यान डॉ. सतीश पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.