मुक्ताईनगर- माजी मंत्री खडसे यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले असून काही प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी व जे कमी आहे ते शेतकर्यांना देण्यासाठी खडसे यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा आमदार हरीभाऊ जावळे यांनी माजी मंत्री खडसेंच्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली.
भाजपाला शून्यापासून शिखरापर्यंत पोहोचवणारे व्यक्तिमत्व -खासदार नंदकुमार चव्हाण
भाजपाला शून्यापासून शिखरापर्यंत पोहोचवणारे व्यक्तिमत्व म्हणजे नाथाभाऊ असल्याचे मध्यप्रदेशचे खासदार नंदकुमार चव्हाण म्हणाले. त्यांच्या या वाक्यानंतर प्रचंड टाळ्यांसह शिट्यांचा कडकडाट झाला. ते बोलत असताना मेघ गर्जना होवून पावसाला सुरुवात झाली व त्यालाच अनुसरून चव्हाण म्हणाले की, आज भाऊंचा वाढदिवस असल्याने प्रत्यक्षात मेघराजालादेखील आनंद होत असल्याने तो बरसत आहे, असे म्हणताच पुन्हा टाळ्यांचा गजर झाला. काँग्रेसची सत्ता असताना वाघासारख्या डरकाळ्या फोडण्याचे धारीष्ट्य केवळ खडसेंमध्येच होते व त्यामुळेच त्यावेळचे मंत्री मागच्या दारून खडसेंना काही काम असलेतर सांगा, असे सांगण्यास विसरायचे नाही, अशी आठवणही त्यांनी सांगितली. राज्यातील समाजातील घटना-घडामोडी सरकारला माहित असो अथवा नसतो त्या नाथाभाऊंना माहित असत, अशी आठवणही त्यांनी सांगताच प्रचंड टाळ्यांचा गडगडाट झाला. नाथाभाऊ असे ते नाव आहे जे मंत्र्यांपेक्षाही आता मोठे झाले आहे, असे चव्हाण म्हणताच पुन्हा सभामंडपात खडसेंच्या आढे बढोच्या घोषणांचा गजर झाला. खान्देशासह मध्यप्रदेशात नाथाभाऊ प्रसिद्ध आहेत कारण विधानसभा निवडणुका आल्या की आम्ही त्यांना तेथे बोलावतो व आमचे उमेदवार यशस्वी होतात, असेही चव्हाण म्हणाले. ‘जिंदगीमे हर तरहसे निभावो अपना किरदार, जब भी परदा गिरे तो लोग तालिया बजाती रहे’ या त्यांच्या शेरला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.
खडसेंचा संघर्ष जवळून पाहिला
राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, माजी मंत्री खडसेंचा संघर्ष जवळून पाहिला आहे. ते सत्तेत असो वा नसो. मधल्या काळात केळी उत्पादकांच्या समस्यांविषयी त्यांनी सरकारला धारेवर धरत केळी उत्पादक शेतकर्यांना मदत मिळवून दिली. भाजपाला वाढवण्याचे काम खडसेंनी केल्याचा गौरव त्यांनी करीत जनतेचे प्रेम त्यांना असेच मिळो, असेही ते म्हणाले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महानंदाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, खासदार रक्षा खडसे, मध्यप्रदेशचे खासदार नंदकुमार चव्हाण, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार उदेसिंग पाडवी, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, मुक्ताईनगरच्या नजमा तडवी, माजी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव सागर फुंडकर, मनोज वाणी (जळगाव), माजी आमदार दिलीप भोळे, बालकल्याण समिती सभापती सुनीता महाले, माजी खासदार गुणवंतराव सरोेदे, माजी आमदार बी.एस.पाटील, भाजपाचे सुनील बढे, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्यासह भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर नगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी केले.