चाळीसगावात पदाधिकार्यांकडून स्वागत ; वरखेडे येथे दिली भेट
चाळीसगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी तालुक्यातील वरखेडे खुर्द येथील तिरमली कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच घटनेबाबत माहिती जाणून घेतली. याप्रसंगी खडसे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना आठ लाख रुपये भरपाई मिळण्यासंदर्भात माहिती दिली तसेच वनविभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला. या भागात अधिकाधिक छावण्या उभाराव्यात तसेच वनकर्मचार्यांची संख्या वाढवावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
तसेच वीज कंपनीच्या अधिकार्यांशीदेखील त्यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. बिबट्याचा अधिवास असलेल्या क्षेत्रात किमान रात्रभर सुरळीत वीजपुरवठा करावा या संदर्भात सूचना केल्या. याप्रसंगी कैलास सूर्यवंशी, माजी आमदार साहेबराव घोडे, वाडीलाल राठोड, नगरपालिका गटनेता राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, राजू अण्णा चौधरी, शेषराव पाटील यांच्यासह पदाधिकारी व उपस्थित होते.
चाळीसगावात स्वागत, वरखेड्यात भेट
वरखेडे मंगळवारी पहाटे झोपडीत झोपलेल्या यमुनाबाई दला तिरमली (65) यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने नाथाभाऊंनी या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. तत्पूर्वी बुधवारी पहाटे नाथाभाऊंचे चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी स्वागत केले. शासकीय विश्रामगृहावरही खडसे यांचे स्वागत करण्यात आले.