जळगावात गौरव सोहळा आमदार डॉ. सतीश पाटील यांचा होता, मात्र सार्यांचा फोकस होता तो नाथाभाऊंकडे. ते काय बोलता ? याची सार्यांना उत्सुकता होती. त्यांनी उत्सुकता नाहीशी केली नाही तर ती आणखी वाढविली. निमित्त काही असो नाथाभाऊ यांची जिल्ह्यातील राजकारणावर घट्ट पकड आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कुठल्याही क्षणी पक्ष सोडू शकता अशा चर्चा चांगल्याच रंगत आहे.
40 वर्ष पक्षाशी असलेली एकनिष्ठता ही त्यांची ताकद आहे. राजकीय कारकिर्दीच्या अशा वळणावर ही ताकद गमाविण्याची रिस्क सध्या ते घेणार नाही, मात्र मी कधीही पक्ष सोडू शकतो, मला गृहीत धरू नका असे संकेतही ते वारंवार पक्षातील नेत्यांना देत आहे. गौरव सोहळ्यातील कानात सांगितलेल्या गुपीताची चर्चा मात्र आता बरेच दिवस रंगणार आहे….. 1990 मध्ये जिल्हाभरात दोनच ग्रामपंचायत सदस्य भाजपचे होते. त्यात एक माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे होते. याचा उल्लेख त्यांनीच गुरूवारच्या सोहळ्यात केला. जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण राज्यात भाजप रूजविण्यात, यशस्वी करण्यात एकनाथराव खडसेंनी घेतलेले परिश्रम विसरता येणार नाही. जिल्ह्यात भाजप जगविण्यात, वाढविण्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. केंद्रात, राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाही जिल्ह्यातील राजकारणावर मात्र एकनाथराव खडसेंची पकड होती. विरोधीपक्षनेता असताना त्यांनी जे वातावरण निर्माण केले होते. त्यातून भाजपचे सरकार आल्यावर खडसेच मुख्यमंत्री हे समिकरणच सगळ्यांच्या डोक्यात फिक्स होते. मात्र तिथे डावलले गेले. त्यांना महसूलसह बरीच खाती मिळाली, आरोप झाले, मंत्रीपद सोडावे लागले हा सारा इतिहास….. आता आरोप झालेले भाजपमधील एकनाथराव खडसे काही एकमेव मंत्री नाही. मात्र त्यांनाच अशी दुटप्पी पणाची वागणूक का? या प्रश्नाचे उत्तर सर्व शोधत आहे. नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या वातावरणाने एकनाथराव खडसे यांचा मंत्रीमंडळातील समावेश पुन्हा चर्चेचा विषय बनला. त्याच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांपेक्षा एकनाथराव खडसे यांनी सामान्यांचे प्रश्न मांडून सत्ताधार्याना म्हणजेच त्यांच्या सहकार्यांना हैराण केले.
अनेक मुद्यांवर अजित पवारांनी त्यांची साथ दिली. त्यामुळे खडसे नाराज असून पक्षाला घराचा आहेर देताय. ते केव्हाही पक्ष सोडू शकता, अशा चर्चा जोर धरू लागल्या. मुळात मंत्रीमंडळात स्थान न मिळणे, आम्ही राणेंना घेऊच हा मुख्यमंत्र्यांनी पुनरूच्चार करणे व खडसेंनी सभागृहात विरोधात बोलणे या सार्या बाबी अशा चर्चांना पोषकच होत्या. पक्षात सध्या रूजलेल्या विचारसरणीत कुठेतरी आपला संघर्ष डावलला जातोय, विसरला जातोय याची जाणीव वारंवार होत असल्याने त्यांनी कदाचित नंतरच्या प्रत्येक कार्यक्रमात चाळीस वर्षाच्या संघर्षाचा उल्लेख केलेला असावा. प्रस्थापितांना भाजप कधीही डावलू शकते, याची प्रचिती विधान परिषद निवडणुकीतच दोन वेळा आलेली आहे. गुरूवारी जळगावात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांच्या सर्वपक्षीय गौरव सोहळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती होती. काही कार्यक्रम राजकारणा पलिकडचे असतात, अशा कार्यक्रमांमध्ये पक्ष महत्त्वाचा नसतो, लढाई ही विचारांची असते, माणूसकीची नसते, असे काहीसे मत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडले. जळगावातील राजकारण सध्या भाजपच्या भोवती फिरत असले तरी त्यात दोन गट सर्वश्रूत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला खडसेंना बोलावले तसे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना का बोलावले नाही? या सर्व सामन्यांना पडणार्या प्रश्नातच त्याचे उत्तर लपलेले आहे ते म्हणजे जिल्ह्यातील राजकारणात केवळ खडसे नाराज आहेत. त्यामुळे त्यांना आपल्याकडे खेचण्याचा हा राष्ट्रवादीचा डाव असेल, ही सर्वसामन्यांची भावना. शिवाय मला काँग्रेस – राष्ट्रवादीकडून ऑफर आलेली आहे हे खडसेंनी काही दिवसांपूर्वीच जाहीर करणं हा योगा योग जुळल्याने कार्यक्रमाची भन्नाट उत्सुकता निर्माण झाली. गौरव सोहळा जरी डॉ. सतीश पाटील यांचा होता, तरी उत्सुकता ती एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीची व बोलण्याची. अजित पवार यांच्या अगदी शेजारच्या खुर्चीवर ते बसलेले असताना सुरूवातीचा काही काळ दोघांमध्ये काही चर्चा झाली नाही. सार्यांच्या नजरा दोघांकडेच टिकून होत्या.
अजितदादा पवारांनी एकदा तरी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा गौरव समितीचे अध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केल्यावर व्यासपीठावर जोरदार राजकीय फटकेबाजी होणार याचा प्रत्यय आला. माजी विधान सभा अध्यक्ष अरूण भाई गुजराती यांनी सर्वात आधी नाथाभाऊंच्या नाराजीचा उल्लेख केला व लोकांना अपेक्षीत असलेल्या खर्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. अखेर नाथाभाऊंच्या भाषणाला सुरूवात झाली. जे तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात नाही, पण मी अजित पवारांच्या कानात जे सांगायच होत ते सांगितलं अस सांगून सस्पेंस मात्र कायम ठेवला. अजित पवार यांनीही तो धागा पकडून नाथाभाऊंनी माझ्या कानात जे सांगितलं आहे ते मी सांगणार नाही. भाजप नेत्यांना आज झोप लागता कामा नये असे सांगून उत्सुकता अधिक ताणली. कानात सांगितलेल्या गुपीतावर मोठ मोठी समिकरणे बांधली जातील, अनेक चर्चा होतील. नाथाभाऊंनी अजित पवारांच्या कानात काय सांगितलंय काही सांगितलय का नाही? हे केवळ नाथाभाऊ व अजित पवार यांनाच ठाऊक.
– आनंद सुरवाडे
उपसंपादक जनशक्ति, जळगाव
9561041018