पालकमंत्री गुलाबराव पाटील : भुसावळात मित्र परीवारातर्फे सत्कार : पाणीप्रश्नी आज मुंबईत विशेष बैठक
भुसावळ- नाथाभाऊंनी मुलासारखे प्रेम केले असलेतरी त्यांनी कधी मला मुलगा समजले नाही. मुलगा म्हणून वापर केला असता तर त्यांना वाईट दिवस आले नसते, अशी कोपरखळीही गुलाबरावांनी लगावली. आपल्याला सोबत घेवून चालले असते तर गुलाबराव पाटलासारखा सच्चा माणुस तुटला नसता, आपल्या रक्तात गद्दारी नाही, लोकसभेच्या निवडणुकीत खासदार रक्षा खडसेंचा जोमाने प्रचार केला, अशी आठवणही त्यांनी येथे सांगितली. शहरातील प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूलमध्ये आयोजित जाहीर नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते. रविवारी सायंकाळी गुलाबराव पाटील मित्र परीवाराने या कार्यक्रमाचे आयेाजन केले होते. प्रसंगी अमृत योजनेसह जळगाव जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवणार असून जेथे पाणी नाही तेथे पाणी देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जि.प.सदस्य पल्लवी सावकारे, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र दायमा, अॅड.जगदीश कापडे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, उद्योजक मनोज बियाणी, नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, मुकेश गुंजाळ, निक्की बत्रा, अॅड.निर्मल दायमा, शहराध्यक्ष बबलू बर्हाटे, स्वीय सहाय्यक विश्वनाथ पाटील, प्रमोद सावकारे, माजी उपाध्यक्ष नंदू महाजन, बापू महाजन, दीपक धांडे, राजू सूर्यवंशी, रमेश मकासरे, नीळकंठ फालक, सुरजीतबाबूजी गुजराल, वरणगावचे शहरप्रमुख रवी सुतार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तर माझ्यासारखा कपाळकंरटा कुणीही नाही
आपल्या आक्रमक शैलीतील भाषणात गुलाबराव म्हणाले की, मी झोपडीकडे पाहून जगतो, महालाकडे पाहून जगत नाही, मंत्री पद येतील अन् जातीलही त्याच्याने फरक पडत नाही मात्र जीवन जगताना असे कार्य करा की पद गेल्यानंतरही 50 कार्यकर्ते सोबत असावेत. पूर्वी सहकार खात्याचा राज्यमंत्री होतो, मर्यादीत अधिकार होते मात्र आता सुदैवाने पाणीपुरवठा मंत्री असल्याने अधिकार असल्याने पाणीप्रश्न निश्चित सोडवणार असून जर मी पाण्याचा प्रश्न सोडवू शकलो नाहीत तर माझ्यासारखा कपाळकरंटा कुणीही नाही, असेही ते म्हणाले. भुसावळ पालिकेचा परत गेलेला 12 कोटींचा निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी देत पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मंगळवारी मुंबईत विशेष बैठक बोलावण्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यास इच्छूक नव्हते
लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर हार गुच्छ घेवून गेले तसे विधानसभेनंतर गेले असते तर कदाचित राज्यातील चित्र वेगळे असते, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यास इच्छूक नव्हते, असा दावाही त्यांनी केला.
शहर विकासासाठी पालकमंत्र्यांचे योगदान -आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, गुलाबराव पाटील हे सर्वांना हवे-हवेसे व्यक्तीमत्व आहे. आलेल्या प्रत्येकाची कामे ते करतात. भुसावळ शहराच्या अमृत योजनेसह शहर विकासासाठी त्यांचे योगदान लागणार आहे. राजकारण हे निवडणुकीपुरता असते, असेही ते म्हणाले. दरम्यान, अॅड.निर्मल दायमा यांनी प्रास्तविक तर सूत्रसंचालन पंकज पाटील व प्रशांत पाटील तसेच आभार पिंटू ठाकूर यांनी मानले. पिंटू कोठारी यांनी पालिकेचा परत गेलेला 12 कोटींचा निधी परत आणण्याची मागणी केली. प्रा.सुनील नेवे, अॅड.जगदीश कापडे, रमेश मकासरे यांनीही प्रसंगी मनोगत व्यक्त केले.