नाथाभाऊंवर अन्याय; विरोधकांची भाषा

0

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर अन्याय झाला असल्याची भाषा विरोधक विधानसभेत बोलत आहेत. खडसेंवर आरोप लागल्यानंतर आकांडतांडव करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक महेतांच्या निमित्ताने खडसे यांची बाजू घेत आहेत. इतकेच नव्हे तर राज्याच्या महत्वाच्या सदनात खडसेंवर अन्याय करणार्‍या सरकारचा धिक्कार देखील घोषणाबाजीमधून केला जात आहे. खडसे यांनी मांडलेल्या मुद्द्यांना देखील विरोधी पक्षातील महत्वाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, जयंत पाटील यांसह पृथ्वीराज चव्हाण देखील समर्थन देताना दिसून येत आहेत.

मागील काही दिवसांपासून खडसे यांची भूमिका देखील सरकारच्या काही धोरणाच्या विरोधी आक्रमक दिसून आली आहे. यामुळे खडसेंच्या निमित्ताने सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न विरोधक करताहेत हे स्पष्ट होत आहे. विधानसभेत जेव्हापासून गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर आरोप लागले जात आहेत तेंव्हापासून विरोधकांकडून वारंवार ’खडसेंना एक न्याय आणि महेतांना वेगळा न्याय का?’ असा सवाल करून धारेवर धरले जात आहे. शुक्रवारी विरोधकांनी विधानसभेत घोषणाबाजी करताना ’खडसेंवर अन्याय करणार्‍या सरकारचा धिक्कार असो’, ’खडसे साहेब उपाशी, नेता आमचा तुपाशी’, ’खडसेंना दिली सजा, नेता मारतोय मजा’ अशा प्रकारची घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावेळी एकनाथराव खडसे हे सभागृहातच उपस्थित होते हे विशेष. दरम्यान शुक्रवारी खडसे उद्योग विभागाकडून एमआयडीसी भूखंडासंबंधी माहितीबद्दल पुन्हा विचारणा करत आक्रमक झाले. भांडून देखील माहिती मिळत नसल्याने त्यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला. या माहितीमध्ये अफरातफर असल्याने माहिती दिली जात नाही हा आरोपही त्यांनी केला. यावेळीही विरोधी पक्षातील अजित पवार, गणपतराव देशमुख, राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना न्याय देऊन माहिती देण्याची मागणी केली. यावरून खडसे यांचे विरोधक उघडपणे समर्थन करत असल्याचे स्पष्ट होत आहे. महेता प्रकरणावरून दोन्ही सभागृहात गोंधळ सुरू असताना वारंवार ’खडसेंना वेगळा न्याय का?’ हा विरोधकांचा सवाल निश्चितच विचार करण्याजोगा आहे.

– निलेश झालटे