महसूलमंत्री चंद्रकांत पाटील : भाजपात अन्याय होत नाही, नाथाभाऊंना न्याय मिळणार असल्याची ग्वाही
मुक्ताईनगर- 1980 मध्ये खडसेंशी परीचय झाला व त्यावेळी जिल्ह्याच्या संघटन मंत्री पदाची आपल्याकडे जवाबदारी होती. सामान्यांच्या प्रश्नांसाठी भांडणारा माणुस ही खडसेंची ख्याती आहे. सरकार आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. जे कायदे ब्रिटीशांनी अंमलात आणले ते बदलण्याची भूमिका त्यांची नेहमीच राहिली आहे. ऑनलाईन सातबारा उतारे मिळायला हवेत, कृत्रिम पाऊस पडायला हवा, नात्यात स्टॅम्प ड्युटी लागायला नको आदी निर्णय त्यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाले आहेत. मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या मंत्र्यांनीही त्यांनी आज शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपात नेहमीच कधीही कुणावरही अन्याय झालेला नाही व होणारही नाही, कधी ना कधी न्याय मिळतो, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांनी खडसेंच्या मंत्री मंडळ आगमनाबाबत वेळ मारून नेली तर जनतेच्या भावना पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचणार असल्याची ग्वाहीही दिली. लवकरच आनंददायी घटना घडेल, अशी प्रार्थना आपण मुक्ताईला करूया, असे सांगून त्यांनी जनतेच्या जखमेंवर मायेची फुंकर घालून या विषयावर अधिक बोलणे टाळले.