नाथाभाऊ तुमची महाराष्ट्राला, आम्हाला गरज- गिरीश महाजन

0

भुसावळ– दीपनगर- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील सख्य जिल्हावासीयांना ठावूक असून सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांनी एकमेकांवर केलेली टिकाही जिल्हावासीयांना नवीन नाही वा ते समोरा-समोर आल्यावर एकमेकांवर टिका करण्याची संधीही सोडत नाही याचा आजवरचा सार्‍यांचाच अनुभव आहे. दीपनगरातील 660 प्रकल्पाच्या भूमिपूजनातही उपस्थितांना तो अनुभव आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत दिल्लीत असलेले गिरीश महाजन गुरुवारी रात्री उशिरा परतल्याचा धागा पकडून नाथाभाऊ म्हणाले की, महाजन हे सहा ते सात दिवस दिल्लीत राहून आल्याने ते कदाचित मराठी विसरले असावेत म्हणून हिंदीत भाषण करावे लागले. अनेक गोष्टी महाजन यांना माहितही नसतात, असे खडसे यांनी भाषणातून बोलल्यानंतर महाजन भाषणात काय बोलतात याबाबत सार्‍यांचीच उत्सुकता होती. महाजन यांनी खडसे यांच्या भाषणाचा धागा पकडत सांगितले की, काल मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीत होतो त्यामुळे रात्री परतण्यास उशीर झाला. खरे तर मी देखील गेल्या काही दिवसांपासून नाथाभाऊ राज्यसभेवर जाण्याच्या तयारीत असल्याचे ऐकल्याची कोपरखळी महाजन यांनी मारली. ते म्हणाले की, नाथाभाऊ तुमची गरज दिल्लीला नाही तर महाराष्ट्राला आहे, जिल्ह्याला आहे, आम्हाला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला जावू देणार नाही, असे महाजन यांनी म्हणताच उपस्थितांमधून हास्याची लकेर उमटली.