महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडेंचे प्रतिपादन ; रक्षा खडसेच राहणार रावेर लोकसभेच्या खासदार
भुसावळ- स्व.गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत जवळचे मित्र असलेले नाथाभाऊ यांच्या शब्दाला आजही पक्षात मान असून त्यांनी सूचना करण्याऐवजी मलाच नव्हे सर्वांनाच आदेश द्यावेत कारण ते पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याचे प्रतिपादन महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले. गुरूनाथ फाऊंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात त्या शनिवारी बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या की, बहिणाबाईंच्या नावातच संस्कृती ओतप्रोत भरली आहे. अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा प्रश्न तसेच आशा वर्करांचा प्रश्न सोडवण्याचे वचन त्यांनी प्रसंगी मनोगतात दिले.
रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसेच -पंकजा मुंडे
महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या कार्याचे कौतुक करून ती माझी लहान बहिण असल्याचे सांगत आगामी खासदारदेखील रक्षाच असेल, असे सांगून त्यांनी खडसे यांच्या बाबतीत उठणार्या वावड्यांना पूर्णविराम दिला. पंकजा म्हणाल्या की, माझ्याकडे असलेल्या खात्यामुळे बचत गट व अंगणवाडी सेविकांचा संबंध येतो तर अंगणवाडी सेविका या पोषण आहार अभियानाचा कणा असून त्यांच्या मानधनाबाबतच्या समस्या लवकरच सोडवल्या जातील. दोन वेळा त्यांचे मानधन वाढवण्यात आले असून काही ठिकाणी मानधनाची अडचण असल्यास तीही मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आशा वर्करांचा प्रश्न आपल्या अखत्यारीतील नसलातरी आपण मंत्री दीपक सावंत यांची भेट घेवून हा प्रश्न तडीस नेवू, असे वचन देत असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रीत बचत करण्याची अफाट शक्ती असून घरात होणार्या उभ्या वा आडव्या बाटलीमुळे ती नवर्यापासून पैसे लपवून ठेवते मात्र अडचणीच्या वेळेत ही बचत आपल्या कामास येते, असे त्यांनी सांगितले. राज्यात दुष्काळ असलातरी बचत गटांनी पूर्णपणे कर्जाचे पैसे फेडल्याचा गौरव त्यांनी केला. श्रीमती सुकळीकर योजनेतून बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळत असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, बुलढा जि.प.सभापती श्वेता महाले, महोत्सव प्रमुख प्रा.सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा नजमा तडवी, डॉ.राजेंद्र फडके, शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे, जि.प.उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, विष्णू भंगाळे, नगरसेवक युवराज लोणारी, उद्योजक मनोज बियाणी, पुरूषोत्तम नारखेडे, प्रा.जतीन मेढे, प्राचार्य सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपा पदाधिकार्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.