जनावरांच्या प्रश्नावरून खडसे-अजितदादांची अनोखी युती
मुंबई (निलेश झालटे) :- जनावरांच्या लाळ्या खुरकत रोगावरच्या लसीसंदर्भातील विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नात सरकार चांगलेच अडचणीत सापडले असून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा घणाघात सुरु झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्यासोबतचा मागील अधिवेशनासारखा स्नेह पुन्हा जुळून यायला लागल्याचे बुधवारी अजून स्पष्ट झाले. ‘मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याऱ्या अवलादी इथं आहेत. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी कोण करणार? तशी चौकशी करूच शकत नाही. नाथाभाऊ तुम्हीच सांगा कोण करणार चौकशी?’ असे अजित पवार यांनी विचारले असता त्यावर खडसे यांनी तात्काळ ‘झोटिंगना नेमा!’ असे उत्तर दिल्याने विधानसभेत एकच हास्याची लहर उमटली.
विधानसभेत नाथाभाऊ व अजितदादांमधील या युतीने सरकारला चांगलेच कोंडीत पकडले. दोघांच्या या अनोख्या युतीचा परिणाम असा झाला कि यामुळे यासंबधीची लक्षवेधी चर्चेसाठी राखून ठेवावी लागली. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील लाळ्या खुरकत रोगावरील लसीसंदर्भात लक्षवेधी सुचना मांडली. यावेळी पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची चांगलीच भांबेरी उडाली.
यावेळी खडसेयांनी सरकारला धारेवर धरत, हे प्रकरण गंभीर आहे. मंत्रीमहोदय उत्तर देत आहेत, त्यावरून गंभीरता लक्षात येते. सात वेळा निविदा काढून त्रुटी निघणे यावर संशय आहे. राज्यातील दोन कोटी आठ लाख 778 गायी म्हशींचे जीव धोक्यात आहेत. अनेकदा केंद्राकडे पत्रव्यवहार झाला. केंद्रिय मंत्र्यांनीही 20 हजार कोटींची नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दर सहा महिन्यांनी लसीकरण होणे आवश्यक असते. लसीकरण झाले नाही, तर पशूंची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. सचिव आयुक्तांचे ऐकत नाही असे मंत्री सांगतात. मुख्यमंत्र्यांनी मागील अधिवेशनात सांगूनही जर काम होत नसेल, तर राज्यात अधिकारी कुणाचं ऐकतात, असा प्रश्न आहे.” आताच्या आता त्या आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करा, असा आग्रह खडसे यांनी केला.