मुंबई – राज्यातील अवर्षणग्रस्त आणि खारपाणपट्टा जमिंनी असलेल्या जिल्ह्यातील कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे. या प्रकल्पातून अवर्षण आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त धुळे जिल्ह्याला डावल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याचा योजनेत समावेश करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी राज्य सरकारला दिला.
या मागणीसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन देऊन शासन दरबारी आवाज उठविला आहे. या प्रकल्पात धुळे जिल्ह्याचा समावेश न झाल्यास येत्या २० मार्चनंतर धुळे जिह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन जागृती आंदोलन करण्यात येईल, अशी इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज्यातील अवर्षणग्रस्त आणि खारपाणपट्टा जमिनी असलेल्या १५ जिल्ह्यांत शासनाच्या पुढाकाराने आणि जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे. येत्या जुलै २०१७ पासून प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ होत असून या प्रकल्पास जागतिक बँककडून २ हजार ८०० कोटी रुपयांची मदत करणार आहे. तर राज्य शासन १ हजार २०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात सततच्या दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त धुळे जिल्ह्याचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.