भुसावळ। शहरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रविवार 14 रोजी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेदरम्यान महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात सुमारे दीड हजार श्री सदस्यांनी गल्ली बोळातील 95 टन ओला व सुका कचरा गोळा करुन शहराबाहेर विल्हेवाट लावली. या अभियानांतर्गत शहरातील 50 किमी रस्ता दुर्तफा स्वच्छ करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत तथा महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जेष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शहरात महास्वच्छता मोहिम श्री सदस्यांनी यशस्वी केली.
आठवडाभरापासून सुक्ष्म नियोजन
यासाठी 32 ट्रॅक्टर, 3 डंपर, 7 पाण्याच्या रिक्षा, 1 जेसीबीचा वापर करण्यात आला. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून स्वच्छता अभियानासंदर्भात सुक्ष्म नियोजन करुन प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी चमकोगिरीपासून कोसोदूर राहून रविवार 14 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत महास्वच्छता अभियान राबविले.
सामाजिक बांधिलकी जोपासत राबविले अभियान
दुर्गंधीची कुठलीही परवा न करता हाती पावडे, झाडू घेवून संपुर्ण शहर स्वच्छ केले. समाज ऋणाची जाणीव ठेवून व सामाजिक बांधीलकी जोपासत प्रतिष्ठानमार्फत हा समाजपयोगी ग्राम स्वच्छता अभियान अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. भुसावळ शहर हे घाणेचे शहर म्हणून घोषीत करण्यात आल्यानंतर राज्यात भुसावळची मान खाली गेली.
येथे झाली स्वच्छता
शहरातील अस्वच्छतेमुळे गेल्या महिन्याभरापासून पालिकेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असून शहराच्या स्वच्छतेबाबात एकजूट अथवा नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. श्री सदस्यांनी शहरातील सर्व मुख्य रस्ते, शासकीय कार्यालय, रुग्णालय, स्टेशन रोड, सिंधी कॉलनी, मुस्लीम कॉलनी, पंचशील नगर, स्मशानभूमी परिसर, शिवाजी नगर अशा विविध परिसरात तसेच शहरातील गल्ली बोळात सफाई केली.