नानासाहेब पेशवे उद्यानाची दुरवस्था

0

पुणे । पुण्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असतानाच कात्रज येथील नानासाहेब पेशवे उद्यानाची दूरवस्था झाल्याचे समोर आले आहे. येथील म्युझिक फांऊटन गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. एकेकाळी पिण्यासाठी वापर होत असलेल्या या तलावाच्या पाण्याला आता दुर्गंधी येत आहे. पंधरा दिवसांपासून उद्यानातील कचराही काढण्यात आलेला नाही. महापालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच उद्यानाची ही दूरवस्था झाली असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

जेएनएनयुआरएम प्रकल्पाअंतर्गत आणि महापालिकेच्या तरतुदीमधून याठिकाणी 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून नानासाहेब पेशवे तलाव आणि उद्यानाचा विकास करण्यात आला. 17 एकर परिसरामध्ये उद्यान आणि तलाव आहे. तर फुलराणी, आजीआजोबा उद्यान असा एकूण 29 एकरचा हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणाचे ठिकाण आहे. जळवच राजीव गांधी उद्यान असल्यामुळे याठिकाणी फुलराणी आणि तलाव पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची दररोज गर्दी असते.

उद्यानात पेशवेकालीन तलाव आहे. एकेकाळी या तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असे. शनिवारवाड्याला सुध्दा कात्रज तलावातून पाणी पुरवठा केला जात होता. काही वर्षांपुर्वी जेएनएनयुआरएमच्या निधीतून या तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले. या कामाची केंद्र सरकारने सुध्दा दखल घेतली होती. मात्र काही दिवसांपासून हा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. भिलारेवाडी आणि मांगडेवाडी या गावामधील मैलापणी या तलावाच्या पाण्यात मिसळत असल्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे. कात्रज घाटामध्ये पडणार्‍या पावसाचे पाणीही या तलावात येते. तलावाच्या मध्यभागी उद्यानामध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून उद्यानाची साफसफाई झालेली नाही. पुर्वीच्या ठेकेदाराची मुदत संपली असल्यामुळे नवीन ठेका मिळेपर्यंत उद्यानाची सफाई बंद आहे. त्यामुळे कचर्‍यामधूनच नागरिकांना मार्गक्रमण करावा लागत आहे. पुरुषांसाठी असलेल्या जीमची दूरवस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील साहित्य खराब झाले आहे. असे असताना याकडे लक्ष देण्यास ना महापालिका प्रशासन तयार आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. जेष्ठांपासून तरुणांपर्यंत सर्वच नागरिक जीमचा उपयोग करतात. अनेक वेळा तक्रारी करूनही दखल घेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

म्युझिकल फाऊंटन बंद
या उद्यानातील तलावात म्युझिकल फाऊंटन उभारण्यात आले आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून हे कारंजे विविध कारणासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. आता तर कारंज्याचे काही साहित्य तलावाच्या बाहेर काढून ठेवण्यात आले असल्यामुळे हे कारंजे सुरू होणार का, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत.

झेंड्याच्या देखभालीची समस्या
राज्यातील सर्वात उंच असा ध्वज याठिकाणी बसविण्यात आला आहे. 15 ऑगस्टला झेंड्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. त्यामुळे आता नव्याने देखभालीसाठी निविदा मागवाव्या लागणार आहेत. तलावाच्या दारात मोठ्या संख्यने अतिक्रमण वाढत असून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.