नाना काटेंकडे विरोधी पक्षनेतेपद?

0

चिंचवडवर राष्ट्रवादीचे लक्ष; राजकीय हालचाली वाढल्या

चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड विधानसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने पाऊलेदेखील टाकण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेता बदलून पिंपळेसौदागर परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या हालचाली पक्षातील वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे, सूत्रांनी सांगितले.

आ. जगतापांना टक्कर देण्याची दादांची खेळी!
पिंपरी महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे केवळ 36 नगरसेवक निवडून आले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी महापौर योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली. परंतु, बहल यांनी सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी केल्याचा सूर पक्षातून आवळला जाऊ लागला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता बदलाच्या हालचाली पक्षात सुरु झाल्या आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद कमी आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने चिंचवड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांना टक्कर देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नवी टीम तयार करत आहेत.

शितोळेंच्या जोडीला नाना काटे!
आक्रमक व अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असलेल्या प्रशांत शितोळे यांची अजितदादांनी थेट पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. कार्याध्यक्ष झाल्यानंतर शितोळे सत्ताधार्‍यांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यांच्या जोडीला ज्येष्ठ नगरसेवक नाना काटेदेखील खंबीरपणे उभे आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद नाना काटे यांच्याकडे देऊन चिंचवड मतदारसंघात ताकद वाढविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.