पटोले काँग्रेसच्या वाटेवर, गुजरातेत प्रचारही करणार
नागपूर/कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सडकून टीका करणारे भारतीय जनता पक्षाचे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांनी अखेर आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे दिला आहे. लोकांची कामेच करता येत नसतील तर लोकप्रतिनिधी तरी कशाला राहू? या शब्दांत भाजपवर टीकास्त्र डागले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी माझ्या नादी लागू नये, असे खणखणीत इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, पटोले हे काँग्रेसच्या वाटेवर असून, लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. राहुल गांधी यांच्यासोबत ते 11 तारखेपासून गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचारही करतील, असेही सांगण्यात आले.
लोकसभा अध्यक्षांकडे सोपविला राजीनामा
खासदार नाना पाटोले यांनी शुक्रवारी दिल्लीत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीकास्त्रही डागले. पटोले यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीदेखील भेट घेतली होती. त्यामुळे ते आता कोणत्या पक्षात जाणार, त्यांची भावी वाटचाल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकर्यांचे प्रश्न असो किंवा भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक खासदार नाना पटोले हे गेल्या महिन्यांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज होते. नरेंद्र मोदी व अमित शहांच्या कार्यशैलीविषयी भाजपत कुजबुज होती, मात्र नाना पटोले यांनी उघडपणे कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. राज्यात आणि केंद्रात असलेले भाजप सरकार आंधळे आणि बहिरे आहे, असा आरोप करत त्यांनी रागही व्यक्त केला होता. यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनात नाना पटोले सहभागी झाले होते. तर यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीदरम्यान शेतकर्यांचा मृत्यू झाला होता. यावरुनही पटोले भाजपवर बरसले होते.