मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वादात आता राजकीय पक्षही उतरले आहेत. तनुश्रीला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या मुंबईतील महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पाटेकरांना अटक करण्याची मागणी केली आहे.
ओशिवारा पोलीस स्टेशनबाहेर आज काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी नाना पाटेकरांविरुद्ध जोरदार आंदोलन केले. नाना पाटेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्या महिलांनी केली आहे. तनुश्री दत्ता हिच्या तक्रारीनंतर काल रात्री ओशिवारा पोलीस ठाण्यात नाना पाटेकर यांच्यासह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३५४ आणि कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने नाना पाटेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान नाना पाटेकरांनी आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. तनुश्रीच्या या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये मी टू मोहिम सुरू झाली असून त्याला बॉलिवूडकरांनी पाठिंबा दिला आहे. तनुश्रीच्या तक्रारीनंतर महिला आयोगानेही नाना पाटेकरांना नोटीस बजावली असून त्यांना १० दिवसात आपले म्हणने मांडण्यास सांगितले आहे.