भारतीय अधिकार्यांना अडकविण्याचा पाकचा डाव
नवी दिल्ली : भारताच्या नौदल, वायुसेना आणि लष्करातील तीन अधिकार्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून गोपनीय माहिती काढण्याचा डाव पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने रचला होता. मात्र सावध झालेल्या या अधिकार्यांनी ही माहिती भारत सरकारला वेळीच दिल्याने पाकचा हा डाव यशस्वी होऊ शकला नाही. हनी ट्रॅपचे जाळे रचल्याचे समजताच या अधिकार्यांनी त्याची माहिती भारतीय दुतावसाला दिली. या अधिकार्यांची चौकशी सुरू असून त्यांनी कोणतेही देशविघातक कृत्य केले नसल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे
तिन्ही अधिकारी दिल्लीत
दुतावासातील ट्रान्सलेशन विभागातील तीन अधिकारी आयएसआयच्या रडारवर होते. यातील एक अधिकारी हॉटेलमध्ये गेला असता तिथे एका महिलेने त्याच्याशी ओळख वाढवली. या महिलेने अधिकार्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे चित्रीकरणही केले होते. संबंधित अधिकार्यांना आपण कशात फसलो हे वेळीच लक्षात आले आणि त्यांनी वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला. दुतावासातील वरिष्ठ अधिकार्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा केली आणि तातडीने त्या तिन्ही अधिकार्यांना दिल्लीत पाठवले.