शिंदखेडा । गेल्या दोन वर्षांपासूनची शेतीमधील नापिकी आणि आगामी खरीप हंगामासाठी बियाणे उधार मिळविण्यासाठी होणारी फरफट सहन न झाल्याने मेथी येथील तरूण शेतकर्यांने राहत्या घरी गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. सुरेश मन्साराम माळी या 35 वर्षांच्या युवकाने 31 मे रोजी दुपारी स्वतःच्या घरी कड्याला दोरखंड बांधून गळफास घेतला.
शिंदखेडा येथील डॉक्टरांचा शवविच्छेदनास नकार
शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील सुरेश यांच्या घरासमोरच्या कुटूंबात लग्न होते. हे लग्न परगावी असल्याने सुरेशची पत्नी कविता आणि मुले ही लग्नासाठी गेले होते. सुरेश यांची पत्नी कविता संध्याकाळी लग्नावरून घरी जेव्हा परतली तेंव्हा तीला सुरेशने गळफास घेतल्याची बाब उघड झाली. मेथी येथील माजी सरपंच भाईजी माळी यांनी शिंदखेडा पोलीसांना कळविल्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. सुरेशकडे तीन बिघे जमीन असून गेल्या दोन वर्षांपासून सततची नापीकी तसेच येणार्या खरीप हंगामाध्ये आवश्यक बियाण्यासाठी होणारी ओढाताण यामुळे ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे बोलले जात आहे. सुरेश यांच्या पश्चात पत्नी कविता, नंदिनी(10 वर्ष), गौरव (7 वर्ष) आणि साई (वय 3 वर्ष) असा परीवार आहे. सुरेश यांचा मृतदेह 31 मे रोजी संध्याकाळी शिंदखेडा येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. मात्र, यावेळी तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने उद्या गुरूवारी धुळ्याहून डॉक्टर येतील असे त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. गुरूवारी डॉक्टरांनी मृतदेहाची परिस्थितीपाहून शवविच्छेदनास नकार दिला. तुम्ही स्वखर्चाने मृतदेह धुळे येथे घेवून जा असा अनाहुत सल्ला देखील डॉक्टरांनी यावेळी दिला. शेतकरी एकीकडे आपल्या हक्कासाठी आंदोलन उभारत असतांना तरूण शेतकर्याने आंदोलनाच्या पुर्वसंध्येलाच आत्महत्त्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी, तसेच हमीभाव मिळावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला असतांना तरूण शेतकर्याच्या जाण्याने दुःख व्यक्त करण्यात येत आहे.