अडावद । अडावद येथील शेतकरी एकनाथ भानुदास महाजन (वय 46) यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. एकनाथ महाजन यांच्याकडे वडीलोपार्जीत 10 बिघे जमीन त्यांनी अडावद विकासोचे 1 लाख 30 हजार रूपये कर्ज घेतले असून गेल्या तीन वर्षापासून शेती मालाला उत्पादन खर्च निघेल इतपतही भाव न मिळाल्यामुळे मुद्दलही निघाली नाही.
गेल्या वर्षी कांद्याला भाव मिळाला नाही तसेच कांद्यावर भुईमूग पेरला त्याला भाव नसल्याने घरात भरून ठेवला. यावर्षी शेताची मशागत करून उसनवारी करून पैसे उभारले. त्या पैशाने पेरणी केली. मात्र पाऊस लांबल्याने शेतात पेरलेले मूग पीकावर वखर फिरवावा लागला आता पेरणीसाठी पैसा कसा उभारावा या चिंतेत असताना एकनाथ महाजन यांनी चार दिवसांपूर्वी चोपडा येथे भुईमूग शेंग विक्रीस काढली. ती फक्त 32 शे रुपये क्विंटल गेल्याने त्यातून आलेल्या नैराश्याने त्यांना ग्रासले त्यानंतर त्यांनी सोमवारी 17 जुलै रोजी शेतात विष घेतले.
अडावद पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद
शेतात विष घेतल्यानंतर त्याच दिवशी दुपारी अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून चोपडा येथील खाजगी रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू असताना मंगळवार 18 जुलै रोजी पहाटे 4 वाचता निधन झाले. त्यांचे पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. सकाळी नऊ वाजता उपजिल्हा रुग्णालयात डॉ. वाघ यांनी शवविच्छेदन करण्यात आले. सकाळी 10 वाजता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाथरवट यांनी खबरीवरून हवालदार भालचंद्र बाविस्कर यांनी पंचनामा केला. तर अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. रवींद्र साळी हे करीत आहेत.