मुंबई – समाधानकारक पाऊस आणि शासनाच्या विविध उपाययोजनांमुळे राज्यात तूर आणि हरभऱ्याचे भरघोस उत्पादन झाले आहे. मात्र, साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्याने तूर खरेदीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नाफेडने राज्य सरकारला मदतीचा हात दिला आहे. नाफेडने जास्तीची 1 लाख टन तूर आणि 75 हजार टन हरभरा खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. नाफेडच्या या निर्णयामुळे तूर-हरभरा खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. तूर आणि हरभऱ्याच्या मेाठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे त्यांच्या साठवणुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी नाफेडकडून पुरेशा गोण्याही उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यातही केंद्र सरकारशी संपर्क साधून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांकडून तूर खरेदीसाठी असलेली मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढविण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी राज्यातील डाळींवरील घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी सध्या लागू असलेली साठवणूक मर्यादा पुढील तीन महिन्यांसाठी तिप्पटीने वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे.