मुंबई | राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणी सहकारी संस्थानी उत्पादित केलेल्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी नाफेड आणि ग्राहक महासंघ यांनी सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना सभासद करून घ्यावे, अशा सूचना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिल्या.
महाराष्ट्र सहकारी विपणन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ यांची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
देशमुख म्हणाले, राज्यात अनेक सहकारी संस्था चांगली उत्पादने तयार करतात परंतु त्यांना योग्य बाजारपेठेची माहिती नसल्यामुळे त्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो, त्यासाठी या संस्थांना सभासद करून घेऊन त्यांना बाजारपेठेचे प्रशिक्षण द्यावे असेही देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघ ही संस्था राज्य पातळीवरील सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे. पणन महासंघ हे अन्नधान्याचा व्यापार तेलबिया व भात यांचे प्रोसेसिंग व पशुखाद्य दाणेदार मिश्र खताचे उत्पादन, कीटकनाशके शेती अवजारे व मशीनरी यांचे वितरण आणि ज्वारी, भात, डाळी, तेलबिया व कांदा आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत महासंघ मध्यस्थ म्हणून काम करत असतो.शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादन करणाऱ्या सहकारी संस्था यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही देशमुख यांनी सांगितले. या वेळी ग्राहक महासंघाचे अध्यक्ष सुखदेव चौगुले, पणन महासंघाचे सरव्यवस्थापक अनिल देशमुख यांच्यासह पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.