नाबार्डकडून होणार मांजरी येथील मुळा-मुठा पुलाचे काम

0

रोहिदास उंद्रे यांची माहिती ; आ. टिळक व आ. मुळीक यांच्या प्रयत्नाला यश

वाघोली : मांजरी बुद्रुक ते मांजरी खुर्द या रस्त्यावरील मुळा-मुठा नदीवरील पुलासाठी नाबार्डकडून निधी मंजूर झाला असून येत्या मार्च-एप्रिलमध्ये कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे यांनी दिली. गुरुवारी (दि. 30) आमदार योगेश टिळेकर, भाजपचे पदाधिकारी, संबधित अधिकारी, मांजरी बु. व मांजरी खुर्दचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मुळ-मुठा नदीवरील पुलाची पाहणी देखील करण्यात आली.

वाघोली-मांजरी मार्गे सोलापूर राज्य महामार्गाला जोडणारा रस्ता असल्यामुळे या रस्त्याने वाहनांची सारखी वर्दळ असते. मांजरी बुद्रुक ते मांजरी खुर्द या दोन्ही गावांच्यामधून मुळा-मुठा नदी वाहते. पावसाळ्यामध्ये नदीवरील पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे हा मार्ग बंद केल्याशिवाय पर्याय राहत नाही. नागरिकांना व वाहनधारकांना दळणवळणासाठी हा सोयीचा मार्ग आहे. वाघोलीहून मांजरी मार्गे सोलापूर महामार्गाला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे पावसाळ्यामध्ये पुलावरून पाणी जात असल्यामुळे नागरिकांना मोठी अडचण निर्माण होते. भाजपचे तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे यांनी नव्याने पूल उभारून उंची वाढवण्याची वारंवार मागणी केली होती. उंद्रे यांच्या मागणीची दखल घेत टिळेकर आणि मुळीक यांनी सातत्याने पत्रव्यवहार करून केंद्र सरकारच्या नाबार्ड योजनेतून या पुलाची उभारणी व्हावी म्हणून पत्रव्यवहार करून राज्य शासनाकडे आग्रहाची भूमिका लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने नदीवरील पुलाच्या उभारणीसाठी 23 कोटी रुपयांच्या निधीला नाबार्ड योजनेने मंजुरी दिलेली असून राज्य सरकारच्या 2019च्या मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशनात या निधीचा समावेश होईल आणि 2019पूर्वी या पुलाची उभारणी होईल, असे उंद्रे यांनी सांगितले.