‘नाबार्ड’च्या माध्यमातून 500 गावांत जल अभियान

0

धुळे। नाबार्डच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील 500 गावांमध्ये जलअभियान राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जलदूतांचा प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच झाला. नाबार्डचे महाव्यवस्थापक विवेक पाटील यांनी ही माहिती दिली आहे. जिल्हा बँकेच्या सभागृहात जलदूतांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम झाला.

यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, नाबार्डचे महाव्यवस्थापक विवेक पाटील, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर, पंकज पाटील, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी उपस्थित होते.

8 हजार जलदूत पोहोचणार 1 लाख गावात
नाबार्डच्यावतीने शेतीच्या पाण्यासाठीचे देशव्यापी अभियान सुरू करण्यात आले आहे. ‘पाणी हेच जीवन’, असे या मोहिमेचे नाव आहे. मे- जून 2017 या कालावधीत राबविण्यात येणार्‍या या मोहिमेतून 8 हजार जलदूत एक लाख गावापर्यंत पोहोचतील. ते सुमारे 1 कोटी शेतकरी, स्त्रिया आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना जलसंवर्धन, जल पुनर्भरण, जलव्यवस्थापन याविषयीचे संदेश देतील. या मोहिमेतून एक कोटीहून अधिक लोक जलसंवर्धनाची शपथ घेतील.या मोहिमेत ग्रामपंचायतीसमवेत गावातील शेतकरी समूह, महिला बचत गट, उत्पादक कंपन्या, पतसंस्था आणि अन्य स्थानिक संस्थांचे साहाय्य आणि सहभाग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये धुळे जिल्ह्यातील 500 गावांची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत ॠगावातील एक दिवसॠ हा दिवसभराचा कार्यक्रम प्रत्येक गावात आयोजित करण्यात येणार आहे. नाबार्डने नियुक्त केलेले दोन कृषी जलदूत आपल्या गावात कार्यक्रम घेतील. ते पूर्ण दिवस त्या गावात राहून युवा स्वयंसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि स्त्रिया यांच्यासमवेत बैठका घेतील. त्याबरोबरच गाव फेरी, गाव नकाशा या उपक्रमांचे आणि कृषी जलसंवाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येईल. शासकीय यंत्रणा व ग्रामस्थांनी या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.