शिरूर । शिरुर शहरातील घोडनदी किनार्यावर असलेल्या दशक्रिया विधी घाटावर नाभिक बांधवांसाठी एक खोली व पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी शिरुर शहर नाभिक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे निवेदन शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांना देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब क्षिरसागर, शहराध्यक्ष रणजीत गायकवाड, गणेश शिंदे, गोरख गायकवाड, विलास रायकर, बाळासाहेब गायकवाड आदींसह नाभिक बांधव उपस्थित होते.
दशक्रिया विधी घाटावर नागरिकांचे मुंडण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे नाभिक बांधवांची गैरसोय होत आहे. त्यासाठी दशक्रिया घाट परिसरात नाभिक बांधवांसाठी एक खोली बांधून त्यामध्ये कडप्प्याची मांडणी करून पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी, तसेच दशक्रिया विधी घाटाची दुरूस्ती करून परिसरात सुशोभिकरण करून देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.