आमदार भाई जगताप : पाचव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा
पुणे : नामदेव ढसाळ यांच्या साहित्याने आंबेडकर चळवळीला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी पँथर्सचा दरारा निर्माण केला होता. त्या माध्यमातून त्यांनी दलित, कामगार चळवळीला न्याय मिळवून देण्याचे काम केले असल्याचे मत कामगार नेते व आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केले.
दलित पँथरच्यावतीने पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पाचव्या स्मृती अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, यशवंत नडगम, डॉ. घनश्याम भोसले, अल्ताफ सय्यद, राष्ट्रवादीचे नगरसेवक चेतन तुपे, नगरसेविका लता राजगुरू, दादासाहेब सोनवणे, सुरेश केदारे, बाळासाहेब पडवळ, अमित जावळे, भीमराव जाधव, सुनील शिंदे
उपस्थित होते.
आंबवडे स्मारकासाठी प्रयत्न
जगताप म्हणाले, ढसाळ यांनी शोषित पिढीत व कामगार चळवळीसाठी मोठा सामाजिक लढा दिला. त्यांची कार्याची महती या समाजात टिकवून ठेवण्यासाठी आपण त्यांचे आंबवडे येथील स्मारक उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कांबळे म्हणाले, दलित पँथरची स्थापना ढसाळ यांच्या संघर्षातून झाली आहे. देशातल्या गोरगरीब, कष्टकरी व दलित बांधवाना न्याय देण्याचे काम त्यांनी पँथरच्या चळवळीतून केले.
प्रास्ताविकात नडगम म्हणाले, पँथरच्या माध्यमातून समाजात समता प्रस्थापित करण्याचे काम केले. परंतु आताचे राज्यकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना बदलायला निघाले आहेत. सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी तर आभार अल्ताफ सय्यद यांनी मानले.