जळगाव शहर मतदारसंघासाठी 394 मतदान केंद्र
जळगाव: विधानसभा निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दि. 27 सप्टेंबरपासून दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करतांना राजकीय पक्षाचा एबी फॉर्म न जोडल्यास नामनिर्देशन पत्राच्या शेवटच्या दिवसापर्यंतच एबी फॉर्म जमा करण्याची मुदत राहणार असल्याची माहिती जळगाव शहर मतदारसंघाच्या निवडणूक निर्णयाधिकारी दीपमाला चौरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान जळगाव शहर मतदारसंघासाठी 394 मतदान केंद्र निश्चीत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेस सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी वैशाली हिंगे, लीला कोसोदे, आदी उपस्थित होते.
जळगाव शहर मतदारसंघासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देतांना निवडणूक निर्णयाधिकारी दीपमाला चौरे यांनी सांगितले की, 4 लाख 196 मतदार आहेत. त्यात 2 लाख 10 हजार 861 पुरूष, 1 लाख 89 हजार 301 स्त्री आणि 34 इतर मतदारांचा समावेश आहे. लोकसभेच्या धर्तीवर विधानसभेसाठी देखिल आदर्श मतदान केंद्र, सखी मतदान केंद्र तयार करण्यात येणार असुन याठिकाणी पाळणाघराची देखिल सुविधा राहणार आहे. शहर मतदारसंघात 871 दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग मतदारांसाठी 10 वाहने आणि 10 व्हिलचेअरची सुविधा करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी 1950 कर्मचारी लागणार आहेत. तसेच मतदानासाठी कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट, व्हीव्ही पॅट मशिन प्रत्येकी 394 लागणार आहेत.
खुल्या प्रवर्गासाठी 10 तर राखीवसाठी 5 हजार रूपये अनामत
विधानसभा निवडणूकीसाठी खुल्या प्रवर्गातुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दहा हजार तर राखीव प्रवर्गासाठी 5 हजार रूपये अनामत भरावी लागणार आहे. उमेदवारांना 28 लाख रूपयांपर्यंत खर्चाची मर्यादा असल्याचे निवडणूक निर्णयाधिकारी चौरे यांनी सांगितले. उमेदवारीसाठी 2 ब हा अर्ज भरावा लागणार आहेत. राजकीय पक्षाच्या उमेदवारांना एक तर अपक्ष उमेदवारांना दहा सुचक आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील उपद्रवींवर कारवाई होणार
जळगाव शहर मतदारसंघात निवडणुकीत बाधा आणणार्या उपद्रवींची यादी तयार करण्यात आली असुन लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे चौरे यांनी सांगितले. या मतदारसंघात चार मतदारसंघ क्रिटीकल म्हणून निश्चीत करण्यात आली आहे.
मतमोजणी वखार महामंडळाच्या गोदामात होणार
मतदानानंतर मतपेट्या औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या गोदामात जमा केल्या जाणार आहेत. याच ठिकाणी मतमोजणी देखिल होणार असल्याचे निवडणूक निर्णयाधिकारी दीपमाला चौरे यांनी सांगितले.