नामांकित चित्रकारांचा बहुरंगी कलाविष्कार “स्वयंम”

0

मुंबई | मुंबई व इतर राज्यातील नामवंत चित्रकार सरफराझ लस्करी, राज भांडारे, पोटली आर्टस चे प्रवर्तक अजय व रितू चांदवानी, शंकर देवरुखे आणि अरुण अवसरमल ह्यांनी एकत्रितपणे सादर केलेल्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन “स्वयंम” हया शीर्षकांतर्गत मुंबईतील वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सुरू झाले आहे. हे प्रदर्शन रसिकांना दि. १० ते १६ जुलै २०१७ ह्या दरम्यान ११ ते ७ हया वेळेत विनामूल्य पाहता येणार आहे. भारतीय स्वातंत्र्यास ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे प्रदर्शन भरविण्यात आले असून मुंबईबरोबरच भारतातील विविध शहरात आणि परदेशात अशी भव्य चित्र प्रदर्शने भरवण्याचे हया सर्व चित्रकारांनी ठरविले आहे. सदर प्रदर्शनात मुंबई व भारतातील विविध राज्यातील पाच चित्रकारांचा समावेश असून त्यांनी जलरंग, तैलरंग वापरुन साकारलेल्या वास्तववादी, निम्न वास्तववादी व अमूर्त शैलीतील विविध चित्रकृतींचा अनोखा आविष्कार रसिकांना पहायला मिळणार आहे.

चित्रकार सरफराझ लस्करी हे अंतर्गत सजावटकार असून लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड आहे. बुदधांची विचारसरणी आणि त्यापासून समाजास लाभणारा संदेश व शांती ह्यावर आधारित त्यांची चित्रे रसिक जनमानसावर योग्य तो परिणाम साधतात. चित्रकार राज भंडारे हे वास्तुविशारद आहेत. त्यांनी अनेक एकल व ग्रुप कलाप्रदर्शनातून आपली चित्रकला सादर केली आहे. सामाजिक प्रश्नांचा आपल्या कलामाध्यमातून उहापोह करून आपले योगदान सादर करण्याबद्दल त्यांना राष्ट्रीय कर्मवीर पुरस्कार मिळाला आहे. तैलरंग, अक्रिलिक, चारकोल, जळलेले काष्ट, स्टील वगैरे माध्यमांचा उपयोग करून बनविलेली त्यांची चित्रे वास्तववादी व आशयपूर्ण आहेत. पोटली आर्टचे प्रवर्तक अजय व रितू चांदवानी यांनी १८ राज्यांतून निवडलेल्या विविध चित्रकारांनी निर्मिलेल्या आकर्षक व मनोवेधक कलारूपांचे रसिकांना दर्शन घडविले आहे. चित्रकार शंकर देवरुखे हे कलाक्षेत्रात नावाजलेले चित्रकार आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक एकल व सामूहिक प्रदर्शनातून आपली कला सादर केली आहे. वास्तववादी व्यक्तिचित्रांचे तैलरंग, जलरंग, मिक्स मिडियम वापरुन कॅनव्हासवर काढलेली त्यांची चित्रे महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा ह्यांचे कलात्मक दर्शन घडवितात. देवदेवतांची चित्रे व धार्मिक संकल्पना विविध चित्रमाध्यमातून साकारताना त्यांनी गायत्री मंत्र, मृत्युंजय मंत्र, देवी दुर्गा मंत्र आदींचा सुलेखनातून समावेश केला आहे. चित्रकार अरुण अवसरमल मुंबईत कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची चित्रे वास्तववादी व निम्न वास्तववादी आहेत. वेगळ्या वैचारिक संकल्पनेतून मानवी रूपांचे व पाळीव पशूंच्या विविध रूपांचे कलात्मक दर्शन त्यांनी चित्रांद्वारे घडविले आहे. असा हा बहुरंगी कलाविष्कार खरोखर मनोवेधक असून सर्वांना आवडेल असाच आहे.