महापालिका विश्लेषण
अमित महाबळ, वृत्तसंपादक, दैनिक जनशक्ती, जळगाव
—-
केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याचे भांडवल करीत जळगाव महापालिकेतील माजी मंत्री सुरेशदादा जैन गटाची सत्ता हस्तगत करण्यात भाजपाला ऑगस्ट 2018 मध्ये प्रथमच यश आले. भाजपाने ही सत्ता मिळविण्यासाठी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जळगावकरांना विकासाचे स्वप्न दाखविले. जाहीरनाम्याद्वारे कर्जमुक्त महापालिका ते समांतर रस्ते यासारखी थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल 27 आश्वासने मतदारांना दिली. ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला…’ असा हा योग होता. सार्वत्रिक निवडणुकीत तो साधला गेला. शहरवासीय तसेही खाविआच्या एककल्ली कारभाराला कंटाळले होते आणि भाजपालाही आपले सत्तास्वप्न पुरे करायचे होते. हे सर्व एकाचवेळी साधले गेले.
महापालिकेत भाजपा सत्तारूढ होऊन साडेचार महिन्यांचा कालावधी झाला आहे. सत्ताधार्यांचा प्रोबेशन पिरीयड तर केव्हाच संपला आहे. या दरम्यान, शहर विकासाच्या दृष्टीने नवीन काय घडले? हा प्रश्न सर्वसामान्यांना अस्वस्थ करीत आहे आणि नेमकी हीच नस विरोधकांनी देखील पकडली आहे. मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षांपूर्वी 25 कोटी रुपये जळगावच्या विकासासाठी दिले होते. महापालिकेतील सत्ताधारी हा निधी खर्च करण्यात अडथळे आणत असल्याच्या शंख त्यावेळी विरोधी बाकांवर बसणार्या भाजपाने पदोपदी केला होता. आता हा पक्ष सत्तेत आहे तरीही राज्य सरकारकडून आलेल्या 100 कोटी रुपयांचा विनियोग त्यांना करता आलेला नाही. या निधीतून 20 ते 25 वर्षांचे ‘रफ अँण्ड टफ’ आयुष्य असलेले सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करता आले असते, त्याऐवजी डांबरी रस्त्यांची कामे केली जाणार असल्याचे ऐकिवात आहे. यातील अर्थ‘गणित’ जनतेसमोर मांडले गेले पाहिजे. तेव्हाच त्याला ‘पारदर्शक’ कारभार म्हणता येईल. कारण, कामे आपलीच आणि मक्तेदारही आपलेच असे कुठेही घडू नये यासाठी सत्ताधार्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
सत्तेची सूत्रे घेतल्यानंतर जनतेचे विश्वस्त म्हणून काम करणार असल्याची भूमिका भाजपाच्या नेत्यांनी मांडली होती याचा विसर पडू देऊ नये. निवडणूक जाहीरनाम्यातील 27 आश्वासनांपैकी कामांचा शुभारंभ केव्हा होईल याची उत्कंठा जनतेला आहे. शहरातील उड्डाणपुल, समांतर रस्ते यासारखे प्रश्न अजूनही सुटले नाहीत याचे भान केंद्र व राज्यातील सत्तेचा गर्व (अहंकार?) असलेल्या नेत्यांनी ठेवणे गरजेचे आहे. ‘गर्वाचे घर खाली’ व्हायला वेळ लागत नाही.
भाजपाच्या नेत्यांनी 57 नगरसेवकांना सभागृहात आणले आहे. शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. त्यापैकी मोजके चार ते पाच नगरसवेक भाजपा नगरसेवकांच्या नाकी दम आणत आहेत. भाजपाच्या टर्ममधील आजपर्यंतची एकही महासभा अशी झाली नाही की, त्यात विरोधक वरचढ राहिले नाहीत. ‘ईव्हीएम’मध्ये जिंकलेल्यांचा दरवेळी सभागृहात दारुण पराभव होतो आणि तो रोखणारा एकही सेनापती पक्षाकडे नसावा याचे आता जनतेला आश्चर्य वाटत आहे. पक्षातच गट-तट नाही ना याची खातरजमा पक्षाने करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यापायी भविष्यात ‘पानिपत’ देखील होऊ शकते. जनतेला कामे हवी आहेत. पण ही पाटी कोरी राहिल्यास भाजपा विरोधक अलबेला (1951) चित्रपटातील ‘भोली सूरत, दिल के खोटे, नाम बडे और दरशन छोटे…’ हे गीत म्हटल्याशिवाय राहणार नाहीत.
—
चौकट
उंट आणि हत्ती
अद्याप बराच मोठा कालावधी सत्ताधार्यांच्या हातात आहे. कुठे चुकत असेल, तर त्यांना आताच सुधारणा करता येईल. जानेवारी 2019 पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध लागत आहेत. अशावेळी जळगावकडे लक्ष द्यायला सत्ताधार्यांना किती वेळ मिळेल याविषयी शंकाच आहे. एकाची आमदारकी दुसर्याने पणाला लावली आहे. पूर्वी युध्दात म्हणे, हत्तीला वाचविण्यासाठी त्याच्यासमोर उंट उभा केला जायचा. जेणेकरून पहिला हल्ला हा त्या उंटावर व्हावा. आता हत्ती कोण आणि उंट कोण हे जनतेने ठरवावे. सैनिक तर गनिमी काव्याने हल्ला करायला टपले आहेतच.