शिरोळ- अनिल कपूरच्या नायक या चित्रपटात अमरीश पुरी आणि कल्लु मामाची एक कारस्थानी जोडी आहे. ही दोन पात्र दिसली की कोण आठवते तुम्हाला? अशी विचारणा करत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आ. धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदी आणि-अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे परिवर्तन यात्रेची शेवटची सभा सोमवारी रात्री झाली. शिरोळ मध्ये उपस्थित असलेला प्रचंड जनसमुदाय हीच आमच्या कामाची पावती आहे, त्यामुळे परिवर्तन होणारच असा विश्वास आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
शिरोळ येथील नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेच्या हाती देऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी दिली यासाठी मी शिरोळवासीयांचे आभारी आहे असं म्हणत त्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठाम विश्वास दाखवण्यास सांगितले.
भाजपचे नेते विरोधी पक्षाच्या महागठबंधनला ठगबंधन म्हणतात. अहो तुम्हीच लोकांना या साडेचार वर्षात ठगलंय. इथल्या भाजपच्या स्थानिक मंत्र्यांनी नगरपालिका निवडणुकीसाठीसुद्धा तीन कोटी रूपये खर्च केला. कुठून आले इतके पैसे? नक्की कोण ठग? असा सवाल करत त्यांनी भाजपाच्या भ्रष्ट व्यवहारावर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक,आमदार श्रीमती संध्याताई कुपेकर, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील,राजेंद्र पाटील यड्रावकर, शिरोळेचे नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, माजी आमदार के. पी. पाटील जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदींसह शिरोळ येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.