कुटुंबियांचा घातपाताचा संशय ; पोलिसांकडून तपासाला सुरुवात
यावल- नायगाव येथील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शुक्रवारी सकाळी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. कडू माधव मेढे (58) हा इसम सोमवारपासून बेपत्ता झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. कडू माधव हे सोमवारी सावखेडा शिवारातील आपल्या शेतात गेले होते पण संध्याकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना फोन केला व घरी लवकर या, असे सांगितले मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने त्यांनी शोधाशोध केली. पुन्हा त्यांच्या मोबाईलवर कॉल केला मात्र कॉलही त्यांनी घेतला नाही. गेले तीन दिवस त्यांचे कुटुंबीय त्यांना शोधत होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्या सावखेडासीम शिवारातील शेताच्या दुर्गंधी येत असल्याने शेतमजुरांनी जाऊन पाहिले तर त्या ठिकाणी मेढे यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
यावल पोलिसांची धाव
याबाबत यावल पोलिसांना माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक एम.जे.मोरे, उपनिरीक्षक अशोक आहिरे, हवालदार संजीव चौधरी, पांडुरंग सपकाळे, सिकंदर तडवी, राहुल चौधरी हे पथकासह दाखल झाले. मेढे यांच्या कुटुंबाला या यासंदर्भात माहिती देण्यात आली. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सायंकाळी यावल ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.रश्मी पाटील या शवविच्छेदन करीत आहेत.