नायगावातील तीन वृद्धांचे खून : गावातील सिरीयल किलर एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : किनगाव गावातील तीन खुनाचीं दिली कबुली : जिल्हा पोलिस अधीक्षकांची पत्रपरीषदेत माहिती
भुसावळ : यावल तालुक्यातील किनगावातील सिरीयल किलरच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून आरोपीने किनगावातील तीन गुन्ह्यांची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परीषदेत दिली. आरोपीच्या अटकेमुळे किनगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. किनगाव येथील मराबाई सखाराम कोळी (75) या वृद्धेच्या खून प्रकरणी आरोपी बाळू उर्फ मुकुंदा बाबुलाल लोहार (30, किनगाव, ता.यावल) यास दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली होती. आरोपीला पोलिसांनी बोलते केल्यानंतर त्याने अन्य दोन खुनांची कबुली दिली असल्याची माहिती डॉ.मुंढे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
तीन वयोवृद्ध महिलांचा केला खून
किनगावातील आत्माराम नगरात 75 वर्षीय वृद्ध मराबाई कोळी या एकट्याच वास्तव्यास होत्या. 23 मे रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी बाळू लोहार वृद्धेवर हल्ला करीत हातातील चांदीच्या पाटल्या हिसकावल्या होत्या व हल्ल्यानंतर जखमी झालेल्या मराबाई यांचा 31 मे 2022 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात एलसीबीच्या आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळताच त्याने मराबाई कोळी यांच्या खुनाची कबुली दिली तसेच 28 फेब्रुवारी 2021 रोजी किनगाव गावातीलच चांभारवाडा भागातील द्वारकाबाई चैत्राम सुरवाडे (70) यांचा गळा आवळून खून केल्याची आरोपीने कबुली दिली मात्र नातेवाईकांनी त्यावेळी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याची बाब पुढे आली आहे शिवाय किनगावातील चौधरीवाडा भागातील रूख्माबाई कडू पाटील (70) या वृद्धेचाही 19 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता रूमालाने गळा आवळून खून केल्याची आरोपीने कबुली दिली आहे.
एलसीबीने उघडकीस आणला गुन्हा
जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत लिंगायत, युनूस शेख, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, सुनील दामोदरे, दीपक पाटील, संदीप सावळे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, राहुल पाटील, ईश्वर पाटील आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.