धुळे । जुनवणे गावात असलेल्या 2 हे.25 आर शेत जमिन एनए करण्यासाठी उपविभागीय अधिकारी धुळे यांच्या कार्यालयात 2015 मध्ये प्रस्ताव दाखल केला होता. याप्रकरणी तहसिलदार धुळे ग्रामीण यांच्याकडे जावून विचारणा केली असता नायब तहसिलदार व लिपीक यांनी 15 हजार रूपयाची मागणी केल्याने त्यांच्यावर धुळे शहर पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
उपविभागीय अधिकार्यांकडे प्रस्ताव होता दाखल
जुनोने शिवारात गट नं. 55/2ब/1/अ असे 2 हे.25 आर. शेत जमिन तक्रारदाराची आहे. ही शेत जमिन एन.ए. करण्यासाठी 2015 मध्ये उपविभागीय अधिकारी धुळे यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. तक्रारदार याने 12/4/2014 रोजी तहसिलदार धुळे ग्रामीण यांच्या कार्यालयात जावून नायब तहसिलदार लोकसेवक हरीष बजरंग गुरव यांना भेटून विचारणा केली. त्यावेळेस नायब तहसिलदार गुरव यांनी प्रस्ताव माझ्याकडे आहे तुम्ही लिपीक प्रदीप देवरे यांना भेटून घ्या ते सांगतील तसे करा. त्यावेळी लिपीक देवरे यांनी सांगितले की, एन.ए. प्रस्ताव व शिफारस करण्यासाठी नायब तहसिलदार यांनी 15 हजार रूपये सांगितले आहे. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता तक्रारदार व नायब तहसिलदार गुरव व लिपिक देवरे यांनी 15 हजार रूपये मागणी केल्याचे ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरून निष्पन्न झाले. म्हणून त्यांच्याविरूद्ध 2/8/2017 रोजी धुळे शहर पोलिस स्टेशनमध्ये भ.प्र.अधिनियम सन 1988 चे 7, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस उपअधिक्षक शत्रुघ्न माळी, पो.नि. महेश भोरटेकर, पवन देसले, जितेंद्र परदेशी, कैलास शिरसाट, सतीष जावरे, कैलास जोहरे, कृष्णकांत वाडीले, देवेंद्र वंदे, मनोहर ठाकुर आदी सहभागी झाले होते.