मुंबई : नारायण राणे पक्षांतर करणार असल्याच्या बातम्या सध्या जोरात चालू आहेत. पण राणे हा शिवसेनेचा जुना खतरनाक वाघ आहे. म्हणूनच सावज टप्प्यात आल्याशिवाय तो झेपावण्याची शक्यता कमी आहे. बाळासाहेबांसारख्या आपल्या गुरूला चकवा देऊन, राणे यांनी बारा वर्षांपूर्वी सेनेला कसा जय महाराष्ट्र केला. तो प्रसंग अनेकजण आज विसरलेले दिसतात. राणे तसेच आजही अतिशय सावध खेळी करीत आहेत. काँग्रेसलाच भवितव्य राहिलेले नाही, म्हणूनच त्यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी नेत्यालाही काँग्रेसमध्ये भविष्य असू शकत नाही. हे राणे यांनी नेमके ओळखलेले आहे. पण जिथे कुठे जायचे त्या पक्षालाही भवितव्य असले पाहिजे हे त्यांना नेमके कळते. तो पक्ष भाजपा किंवा शिवसेना असू शकतात.
राणे यांनी तेव्हा विधानसभेतले विरोधी नेतेपद आपल्याकडेच ठेवून, शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा दिलेला होता. त्यामुळे सेनेच्या तमाम नेत्यांची तारांबळ उडालेली होती. अगदी सेनेच्या आक्रमक नेत्यांशी दोन हात करण्यापर्यंतही राणे समर्थकांनी तेव्हा मजल मारली होती. सेनेच्या विधानसभेतील गटाचे नेतृत्व आपल्याकडे कायम ठेवून, राणे यांनी सेनेची मोठी तारांबळ उडवून दिली होती. असा धुर्त नेता अकस्मात किरकोळ पद्धतीने कॉग्रेस सोडून चालता होण्याची अजिबात शक्यता नाही. मात्र त्यांच्या मागे काही आर्थिक कटकटी असल्याने, भाजपात जाणे त्यांच्या सोयीचे आहे. पण भाजपा त्यांना कितपत हाताळू शकेल याची शंका आहे.
भाजपाचा कुठलाही राज्य पातळीवरचा नेता राणेंना संभाळू शकणार नाही. त्यांच्या आक्रमक प्रवृत्तीला कह्यात ठेवणे भाजपाला शक्य नाही. राहिला पर्याय शिवसेनेचा! सेनेला राणे उपयुक्त आहेत. कारण उद्धव यांना एक आक्रमक सहकारी व उत्तम वक्ताही मिळू शकतो. खेरीज आज सिंधुदुर्ग राणेंनीच जिंकला असल्याने, त्यांच्याच सोबत जिल्हा परिषदेतील सगळे राणेनिष्ठ सेनेत दाखल होऊन, कोकणात सेनेची निरंकुश सत्ता सिद्ध होऊ शकते. पण पक्षप्रमुखांना घेरून बसलेल्या लोकांना राणे नको असू शकतात. कारण राणेंसारख्या आक्रमक नेत्यासमोर दरबारी राजकारण करणार्यांचा टिकाव लागणे अवघड आहे. या तिढ्यातून सुटल्यास राणे काँग्रेसमधून बाहेर पडू शकतील. नव्वद टक्के ते सेनेत जाऊ शकतात आणि फक्त दहा टक्के भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.