नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या ५ जागा लढविणार

0

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र ही केवळ चर्चाच ठरली असून नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या पाच जागा लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत राणे यांनी काल सोमवारी रात्री यासंबंधी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जागावाटपावरून चर्चा झाली. यावेळी राणे यांचा स्वाभिमान पक्ष राज्यातील लोकसभेच्या पाच जागा लढविणार असल्याचे ठरविण्यात आले. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा-कोल्हापूरमधील प्रत्येकी एक, सोलापूर एक आणि औरंगाबादमधील एक अशा पाच जागांवर बोलणी झाल्याचे बोलले जात आहे.

भाजप नेतृत्वावर नाराज असल्याने नारायण राणे यांनी भाजपवर टीका केली होती. तोंडसुख घेतले होते. यानंतर भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा अजेंडा बनविण्याच्या समितीवर घेतले होते. दरम्यान नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. यामुळे राणे राष्ट्रवादीत जाणार अशाही अफवा उठल्या होत्या. यानंतर राणे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांनी केले होते. पण नितेश राणे यांनी ट्विट करत राणे काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.