नारायण राणेंची कोंडी कायम!

0

महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलेच परिचित असलेले नाव म्हणजे नारायण राणे. कोकणातला एक वजनदार नेता, अशी त्यांची ओळख आहे. परंतु, सध्या त्यांची ससेहोलपट चालू आहे. राजकारणात एकाचवेळी अनेकांना अंगावर घेणारा हा नेता. खरेतर असे चालत नाही. त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये पाऊल टाकले तेव्हापासूनच राणेंचे राजकारण चुकत गेले. त्यांना काँग्रेसी कल्चर अवगत नसल्याने दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांनी त्यांना अनेक वर्षे फसवले. 1999ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले आणि दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चित विराजमान झाले. यामुळे दुखावलेल्या काँग्रेसच्या जुन्या खोडांनी राणेंचा वापर केला आणि त्यांना नुसत्या सतत दिल्ली वार्‍या घडवल्या. नारायण राणे 1999 ते 2009 हा तब्बल 10 वर्षांचा काळ त्याच कामात व्यस्त राहिले. काँग्रेसचे जितके महाराष्ट्र निरीक्षक आणि प्रदेशाध्यक्ष झाले त्यांनी विलासरावांना जेरीस आणण्याच्या नावाखाली राणेंना टोप्या घातल्या. हे वास्तव आहे. मात्र, विलासराव या सार्‍यांना पुरून उरले. नारायण राणे शिवसेनेत होते तेव्हा कोकणातील जनतेचे त्यांच्यावर निस्सीम प्रेम होते. राजकीय हत्या, अपहरण असे कितीही आरोप त्यांच्या विरोधकांनी राणेंवर केले तरी कोकणातल्या सामान्य लोकांचे राणेंनी कधीही वाईट केलेले नाही, अशीच भावना सामान्य कोकणवासीयांच्या मनात तेव्हा होती. अवघ्या 8 महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत राणेंनी मागासलेल्या सिंधुदुर्गाला रस्ते, पाणी, रोजगार इत्यादी सर्वच मूलभूत गरजांबाबतीत प्रगतिपथावर नेले. राणे त्यावेळी खरोखरंच कोकणचे वाघ होते. मनोहर जोशींच्या मुळे राणेंना प्रथम बाजूला सारण्यात आले आणि नंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या चुकीच्या धोरणामुळे राणे दुखावले. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंकडूनही राणे यांना न्याय मिळत नाही, असे दिसल्यावर राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. या वाघाला शिवसेना आणि उद्धव ठाकरेनी डिवचल्यावर सगळा कोकण राणेंच्या मागे खंबीरपणे उभा राहिला कारण कोकणवासीयांचा शिवसेनेपेक्षा राणेंवर जास्त विश्‍वास होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये साक्षात बाळासाहेबांनी सभा घेऊनदेखील परशुराम उपरकरांची अनामत रक्कम वाचू शकली नाही. कारण शिवसेनेने या नेत्याच्या रूपाने कोकणी लोकांचा स्वाभिमान ठेचण्याचा प्रयत्न केला, असा समज झाला होता. राणेंसोबत त्यांचे जे समर्थक आमदार त्यांच्यासोबत बाहेर पडले त्यांनादेखील कोकणवासीयांनी भरघोस मतांनी विजय मिळवून दिला.

दादा कोणत्याही पक्षामध्ये गेले, तरी फक्त कोकणच्याच विकासाचा विचार करतील असा 100% विश्‍वास त्यावेळी कोकणच्या लोकांना होता. लवकरच कोकणचा स्वाभिमान काय असतो याची प्रचिती काँग्रेसवाल्यांनादेखील आली. ज्या मुख्यमंत्रीपदाची ग्वाही देऊन सोनिया गांधीने राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता ते पद मिळत नाही म्हटल्यावर कोकणच्या वाघाने दिल्लीमध्ये डरकाळी दिली. काँग्रेसच्या इतिहासात जे करायची हिंमत कोणा खासदाराला झाली नव्हती ती किमया कोकणच्या एका आमदाराने म्हणजेच राणेंनी केली. दिल्लीत जाऊन त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अहमद पटेलांची पत्रकार परिषद घेऊन जाहीर पत्रकारपरिषद घेऊन लायकीच काढली आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

त्यानंतर राणे यांची समजूत काढत काँग्रेसमध्ये त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात आला. राणेंनी नाईलाजापोटी केलेली ती एक राजकीय तडजोड होती. मात्र, राणे यांनी त्यानंतर कोकणातील मायनिंग आणि ऊर्जा प्रकल्पांचे समर्थन करत जे विस्थापन केले, त्यानंतर हळूहळू त्यांनी आपला कोकणी माणसाच्या मनातला विश्‍वास गमावला. लोकांनी एखाद्या प्रकल्पाला विरोध केल्यावर कधीही लोकांच्या भल्याचा विचार करत मागे न हटणार्‍या राणेंनी कळणेत मात्र पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावून लढणार्‍या लोकांना पोलिसांकरवी मारहाण केली आणि आंदोलकांवर खोटे आरोप लावून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांनी भरभरून प्रेम, आशीर्वाद दिले त्याच मायबाप जनतेवर अमानुष लाठीमार करवणार्‍या राणेंविषयी कोकणी माणसांच्या मनात जो होता-नव्हता तो आदरदेखील संपला. राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर निसर्गाची देणगी लाभलेला कळणेचा निसर्गरम्य पट्टा मायनिंग करत त्यांनी ओसाड करुन टाकला. त्याच वेळी काँग्रेसने विनाशकारी अणुऊर्जाप्रकल्पासाठी कोकणातील जैतापूर ही जागा निवडली.

देशातील इतर कोणत्याही भागांत या प्रकल्पाला कडाडून विरोध झाला असता. त्यामुळे दादागिरी करण्यासाठी प्रसिद्ध असणार्‍या नारायण राणेंना प्रथम काँग्रेसने शांत केले. त्यानंतर राणे यांनी चिंटू शेखवर गोळीबार करणार्‍या आपल्या चिरंजीवांना राजकारणात आणले. राणेंनी राजकराणात कितीही गुंडगिरी केली, तरी कधी सामान्य लोकांवर हात उचलला नव्हता, पण त्यांच्या चिरंजीवांनी ही उणीवदेखील भरून काढली. वेंगुर्ल्यातील नीतेशच्या या दादागिरीनंतर राणेंनी कितीही सारवासारव केली, तरी त्यावेळी नगरपालिका निवडणुकांमध्ये सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगरपालिकेत एकत्रित मिळून 35 पैकी फक्त 1 जागा निवडून देत राणेंना चपराक दिली. 2014ची निवडणूक राणेंसाठी दुर्दैवी ठरली. सिंधुदुर्गात दीर्घकाळ निर्विवाद राजकीय वर्चस्व गाजवणारे राणे यांना कुडाळमधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पराभवाची धूळ चारली. ते जायंट किलर ठरले. राणे यांना 2014च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने खूपच बाजूला सारले. ना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले ना कोणती महत्त्वाची जबाबदारी. त्यामुळे त्यांनी अखेर काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, पण भाजपने त्यांना थेट आतमध्ये प्रवेश न देता वेगळा पक्ष स्थापन करण्यास भाग पाडले. घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेसमधून सीमोल्लंघन करणारे आणि भाजपमधील प्रवेशासाठी ताटकळत राहणारे नारायण राणे यांनी अखेर नव्या राजकीय इनिंगची घोषणा केली. नारायण राणे यांनी आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केली. आता मात्र राणे यांनी आपली कोकणावरीच सैल झालेली पकड पुन्हा मजबूत केली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या राणेंनी त्यांचा हिसका पुन्हा एकदा दाखवला. ग्रामपंचायती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत राणेंनी आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा राणे यांनी मुसंडी मारली आहे. त्यांच्या समर्थ विकास पॅनलने कमाल करून दाखवली. कोकणात राणेंनी वेगळी चूल मांडली आणि ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली.

पहिल्याच प्रयत्नात राणेंनी बाजी मारली. त्या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागला. राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक चांगली कामगिरी केल्याने राणेंचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आलेे. राणे यांचे सध्या तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर वर्चस्व आहे. तेथील नगरपालिका आणि जिल्हापरिषदाही राणे यांनी ओढून आणल्या आहेत. त्यामुळे राणेंचे कोकणासाठी का होईना उपयोग मूल्य आहे हे राजकीय पक्षांना चांगलेच ज्ञात आहे. एकतर आपले उपयोग मूल्य आणि उपद्रवमूल्य सर्वांना अवगत असावे किंवा कोणाचा तरी वरदहस्त आपल्या डोक्यावर असावा हे राजकारणातले गणित राणेंना ठावूक आहे. प्रॉब्लेम इतकाच आहे की, त्यांना सध्या कोणीही राजकीय गॉडफादर नाही. संघाचे राजकारण त्यांना स्वीकारायला तयार नाही. एखाद्याला आपण नकोसे वाटतो तेव्हा कोणाला तरी हवे, असे वाटायला पाहिजे. हे राजकीय गणित राणे थोडे चुकले आहेत. ते जो दरवाजा ठोठावताहेत त्यांच्या म्होरक्यांना ते नको आहेत. परंतु, त्यांचा वापर हवा आहे, त्यामुळे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी अवस्था भाजपची झाली आहे. कोकणात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना राणे धूळ चारू शकतात हे भाजपला ठावूक आहे. मनसेचा कोकणात सुपडासाफ झाला आहे. त्यामुळे भाजपला ते हवे आहेत. परंतु, नेता म्हणून नव्हे तर मांडलिक म्हणून हवे आहेत. म्हणूनच भाजपने त्यांना स्वतंत्र पक्ष काढायला लावून वेगळा मांडलिक राजा बनवले आहे. त्यांना आणि त्यांच्या मुलाला मंत्रिपद हवे आहे. परंतु तूर्तास भाजप त्यांना राज्यसभा देऊन शांत करण्याच्या प्रयत्नात आहे. 6 तारखेला अमित शहा याबाबतचा फैसला करणार. आहेत, तोपर्यंत त्यांची घालमेल कायम आहे.

ऑफर आणि तडफड…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद, महसूल, दुग्धविकासमंत्री, उद्योगमंत्री, अशा अनेक महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या नारायण राणेंची राजकीय पुनर्वसनाची तडफड अजूनही कायम आहे. शिवसेना, काँग्रेस आणि स्वतःचा स्वाभिमानी पक्ष काढून सध्या भाजपशी जुळवलेले सूत असा राणेंचा राजकीय प्रवास लडखडतोय की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांना आता राज्यसभेवर जा, अशी ऑफर दिली आहे. परंतु, त्यांना राज्यात महत्त्वाचे मंत्रिपद हवे आहे. 2019 नंतर दिल्लीला जाण्याची त्यांची तयारी आहे. परंतु, शिवसेनेचा उघड विरोध असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अडचण झाली आहे. शिवसेनेला सध्या दुखवण्याचा भाजपचा मानस नाही, परंतु, राणेंचे पुनर्वसन फार लांबवणेही शक्य नाही. त्यामुळे मुरब्बी राजकारण्यासारखा डाव मुख्यमंत्र्यांनी खेळला आहे. राणे अजून मनापासून राजी नाहीत. परंतु, त्यांना सध्या पर्यायही उरलेला नाही!

राजा अदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111