मी माझ्यासाठी नाही तर मुलांच्या राजकीय भवितव्याचा विचार केला. त्यामुळेच मी प्रवेश करतोय;अशा न विचारलेल्या प्रश्नांना राणे उत्तरे देत होते. सर्व काही झाले होते,आता कुठे अडलेय काहीच समजत नाहीय,काहीच अंदाज येत नाहीय. कधी एकदा प्रवेश होतोय याची घाई राणेंना झालीय. एवढे लांबल्यामुळे आता राणेंचा प्रवेश हा भाजपच्या अटींवर होईल,असे स्पष्ट दिसतेय. भाजपला राणेंची गरज नाहीय तर राणेंना भाजपची गरज आहे एवढे मात्र या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
नारायण राणे यांचा कणकवली आणि वांद्रे या दोन विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राणे अस्वस्थ होते. 1990 पासून विधानसभेत निवडून येणारे राणे 2014 ला विधिमंडळात प्रवेश करु शकत नव्हते. कोणत्याही परिस्थितीत विधिमंडळात जाण्याचा चंग त्यांनी बांधला होता. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा विरोध असताना राणे यांनी विधानपरिषदेचे तिकीट दिल्लीतून आणले आणि विधानपरिषदेत प्रवेश मिळावला. विधानपरिषदेत येताच राणे यांनी आपल्या आक्रमक शैलीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर आसूड ओढण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री फडणविस यांनाही लक्ष्य केले. विधानपरिषदेत राणे यांनी बर्यापैकी सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणले होते. मग, लगेचच राणेंची प्रकरणे शोधण्यास सुरुवात झाली. राणेंचे असे प्रकरण सापडले की राणेंना थेट तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था सरकारने केली. गेल्या दिवाळी दरम्यान राणेंवर इडीने गुन्हा दाखल केला. मग मात्र त्यांची पंचाईत झाली. त्यामुळे राणे बॅकफूटवर गेले. सुरुवातीला काही दिवस शांत बसले. मग भाजपशी जुळवून घेण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री फारसा भाव देत नाहीत पाहून राणेंनी थेट अमित शहांकडे वशिला लावून भाजपशी सलगी करण्यास सुरुवात केली.
यादरम्यान त्यांच्यापुढे दुसरे संकट उभे ठाकले. आमदार असलेला मुलगा नितेश ऐकेना. त्याला शिवसेनेत जायचे होते. शिवसेनेत भवितव्य आहे असे त्याचे म्हणणे होते पण इडीच्या संकटातून वाचण्यासाठी त्यांना भाजप मध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर भाजप मध्ये जाण्याचा निर्णय पक्का झाला. अमित शहांची भेट ठरली.अमित शहानी मुख्यमंत्र्यांना राणे यांना अहमदाबाद येथे घेऊन येण्यास सांगितले. मिडिया पासून लपवण्यासाठी अहमदाबाद येथे भेट ठरवण्यात आली तरीही मिडीयाला ही समजली.त्यामुळे राणे आणि फडणविस अहमदाबाद ला पोहोचण्यापूर्वीच टीव्ही मिडिया तेथे पोचला होता. त्यामुळे राणे यांची पंचाईत झाली. काँग्रेस पक्षश्रेष्ठीना ही बाब समजताच राणे अस्वथ झाले. त्यामुळे राणे भाजप प्रवेश करणार हे जगजाहीर झाले. आता तर राणे यांनी काँग्रेस वर जाहीर टीका केली आहे. आता फक्त प्रवेशाचा मुहूर्तच शिल्लक आहे. पण हा मुहूर्तच सापडत नाहीय. भाजपवाल्यांनी राणेंचा गेम केला अशी चर्चाही सुरु झालीय.
सध्या राज्यभर भाजपला मिळत असलेले यश पाहता भाजपला नारायण राणेंची गरज नाही तर राणेंना भाजपची गरज आहे.त्यामुळेच भाजप नेते राणेंचा प्रवेश लांबवत आहेत. सुरुवातीला उध्दव ठाकरे आणि फडणविस यांनी राणे यांना शिवसेना किंवा भाजप मध्ये घ्यायचे नाही असा अलिखित करार केला होता. पण भविष्यात भाजपला एकला चलो रे अशी भूमिका घेण्यासाठी हौशे गवशे नवशे हवे आहेत.त्यामुळेच राणेंना ते घेत आहेत.
राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या आल्यानंतर भाजपमधील काही बड्या नेत्यांनी राणे भाजपमध्ये आल्यास स्वागत करू, अशी विधाने केली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर नारायण राणे यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम पद सोडण्यासही होकार दिला होता. नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशावरून काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही राणे म्हणजे ’दलबदलू नेते’ असे टीकास्त्र सोडले. राणे हे पैशाचे नाही तर सत्तेचे भुकेले आहेत असे विधान शिवसेनेच्या नेत्यांकडून हमखास ऐकायला मिळते. परंतु सध्या राणे हे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी झटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नारायण राणे यांचा भाजप प्रवेश कधी? याची उत्सुकता आहे. नारायण राणे भाजपमध्ये गेले किंवा नाही गेले तर काय या प्रश्नाबाबत सगळ्यांनीच राजकीय गणिते मांडायला सुरुवात केली. परंतु नारायण राणे यांचा भाजप पक्षप्रवेश लांबण्याची चर्चा ऐकून राणे यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढावा, असा आग्रह देखील काही राणे समर्थक करत आहेत.
नितीन सावंत- 9892514124