नारायण राणेंची परीक्षा सुरू!

0

मुंबई : नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर विधान परिषदेची एक जागा रिकामी झाली होती. या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून 7 डिसेंबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी नारायण राणे आपल्या पक्षाकडून उमेदवार असू शकतात. नारायण राणे यांची ही पहिली परीक्षा असेल. कारण केवळ भाजपच्या बळावर राणे यांना ही निवडणूक जिंकायची आहे. राणे यांना मित्र कमी आणि शत्रु, स्पर्धक जास्त अशी काहीशी स्थिती सध्यातरी दिसत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापुर्वीच निवडणूक
शिवसेना, काँग्रेस असा राजकीय प्रवास करणारे नारायण राणे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीगाठी घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे प्रयत्न केले. मात्र अपेक्षेप्रमाणे या प्रयत्नांना यश आले नाही. त्यानंतर स्वत:चा पक्ष स्थापन करत राणे यांनी भाजपच्या उंबरठ्यावरच राहणे पसंत केले. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थान करत ते एनडीएमध्येही सहभागी झाले. राणेंची भाजप सरकारमध्ये वर्णी लागेल, अशीही चर्चा सुरु असताना मंत्रिमंडळ विस्ताराच लांबणीवर पडल्याने राणे यांचे राजकीय भवितव्यही लटकले आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी विधान परिषदेची पोटनिवडणुक लागल्याने राणेंसाठी ही परीक्षाच ठरणार आहे. ही पोटनिवडणूक राणेंसाठी सोपी नसल्याचेही बोलले जात आहे.

भाजपची 122 मते राणेंच्या पाठीशी?
विधान परिषदेच्या या जागेसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नारायण राणे उभे राहिले तर निवडणूकीत रंगत येणार आहे. त्याचवेळी भाजपमधील आमदार, नेते राणेंना किती मदत करतात याबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे राणेंना दगाफटका होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. भाजपची 122 मते राणेंच्या पाठीशी निश्‍चित असल्याचे मानले जात आहेत. तर अन्य 20 मतेही राणेंना सहकार्य करतील असे मानले, तर ही संख्या 142 (122+20) वर जाते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार मिळून 83 संख्याबळ होते. शिवसेनेचे 63 आमदार यामध्ये जोडल्यास संख्याबळ 146 (83+63) पर्यंत जाते. त्यामुळे ही पोटनिवडणूक रंगतदार होईलच शिवाय राणेंचे राजकीय भवितव्य ठरविणारीही असेल.

राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची
नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रात मते फुटली होती. भाजपच्या मदतीला अदृश्य हात आले होते. ते हात यावेळी नारायण राणे यांच्यासाठी पुढे येतील का हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते एकत्र बसून, यावर चर्चा करतील आणि भूमिक ठरवतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. शिवसेना राणे यांना कदापि मदत करणार नाही हे तर स्पष्टच आहे. नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे आणि कट्टर समर्थक कालिदास कोळंबकर अशी दोनच मते राणेंची हक्काची मते आहेत. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश होऊ नये म्हणून शिवसेनेने आधीच ताठर भूमिका घेतली आहे. नारायण राणे यांनी काँग्रेस सोडताना अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस तरी राणेंच्या पराभवासाठी जोर लावणार हे स्पष्ट आहे. यामध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय असणार हे समजणे कठीण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेहमीच संशयाने पाहिले जाते.