नारायण राणेंचे दसर्‍यापूर्वी सीमोल्लंघन!

0

मुंबई । काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवत दसर्‍यापूर्वी सीमोल्लंघन करणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे. सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर त्यांनी हा इशारा दिला आहे. काँग्रेस कमिटीने नारायण राणे समर्थक दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करुन,विकास सावंत यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली.

काँग्रेस संपविण्याचे काम
अशोक चव्हाणांनी महाराष्ट्रात काँग्रेस संपविण्याचे काम हाती घेतले आहे. काँग्रेस सत्तेवर कशी जाईल हे पाहण्यासाठी मी प्रयत्न केले, मात्र कुरघोडी करणारी मंडळी तेव्हा कुठे होती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 2005 मध्ये मी काँग्रेसमध्ये आलो. देशपातळीवर काम करायला मिळेल असे वाटले होते. पण माझी सपशेल निराशा झाली. मला देण्यात आलेले एकही आश्वासन काँग्रेसने आजवर पाळलेले नाही. त्यांनी या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच ते यशस्वी पंतप्रधान ठरावेत अशीही अपेक्षाही राणेंनी व्यक्त केली.

नातवाच्या वाढदिवसादिवशी सीमोल्लंघन करत आहे. नवरात्रीत याचा शेवट करेन. महाराष्ट्रात जो माणूस यशस्वी होईल, ज्याला जनता निवडून देते त्याला संपविण्याचे काम काँग्रेसकडून होते आहे. जे लोक काँग्रेसला संपवू पाहात आहेत त्यांना मी त्यांची जागा दाखवून देईन. मी काँग्रेसमध्ये आल्यापासून अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश यांना मी नकोय म्हणून ते षडयंत्र करत आहेत.
– नारायण राणे