नारायण राणेंच्या शहाभेटीवरून सस्पेन्स!

0

पक्ष विचारधारेचा स्वीकार असेल तर राणेंचे भाजपात स्वागत : सरोज पांडे

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष व विधानपरिषद सदस्यत्वाचा त्याग केल्यानंतर राज्यातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी दिल्ली गाठून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीचा सविस्तर तपशील हाती आला नसला तरी, भाजपप्रवेशाबाबत राणे व शहा यांच्या चर्चा झाल्याची माहिती राणेंच्या निकटवर्तीयांनी दिली. यावेळी राणे यांनी शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुडाळ येथील स्वनिर्मित रुग्णालयाच्या उद्घाटनाचेही निमंत्रण दिले. दरम्यान, भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी राणेंच्या भाजपप्रवेशाचे स्वागत केले. राणेंना भाजपची विचारधारा स्वीकारार्ह असेल तर त्यांचे पक्षात नक्कीच स्वागत आहे; तथापि त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत पक्षाध्यक्षच निर्णय घेतील, असे पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजपप्रवेश?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे यांनी नुकतेच काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र डागत काँग्रेस सोडली होती. त्यानंतर त्यांची पाऊले भाजपकडे वळत असल्याची चर्चा रंगत असताना, भाजपनेतृत्वाने मात्र सावध भूमिका घेतली आहे. राणे यांनी सोमवारी दिल्ली गाठून भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर रात्री उशीरा ही भेट झाल्याचे सांगण्यात आले. या भेटीत पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली. तथापि, शहा यांनी राणेंना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. चर्चेचा तपशील कळला नसला तरी, यानिमित्ताने राणे यांनी शहांना कुडाळ येथील स्वनिर्मित रुग्णालयाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले. तसेच, हे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही भेटीची वेळ मागितली होती. राज्यात लवकर मंत्रिमंडळ विस्तार प्रस्तावित असून, तत्पूर्वी राणे यांना भाजपात प्रवेश देण्याचे घाटत आहे. तथापि, भाजपचे केंद्रीय नेतृत्व अत्यंत सावधपणे पाऊले उचलत असल्याने राणेंची मोठी गोची झाली आहे.

राणेंसोबत अनेकांचाही होणार भाजपप्रवेश…
काँग्रेस सोडण्याची घोषणा करताना नारायण राणे यांनी दसर्‍यापूर्वी राजकीय घोषणा करू, असे सांगितले होते. त्या दृष्टीने पुढील राजकीय वाटचाल ठरविण्यासाठी राणेंकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यात 5 किंवा 6 ऑक्टोबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तत्पूर्वी भाजपात प्रवेश करून मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी राणेंचे प्रयत्न सुरु आहेत. नवी दिल्लीत शहा व राणे यांच्यात झालेल्या भेटीचा तपशील हाती आला नसला तरी, मंत्रिमंडळात स्थान आणि इतर राजकीय भवितव्याबाबत शहांसोबत त्यांची चर्चा झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. राणे यांच्यासोबत शिवसेना व काँग्रेसचे इतर काही नेतेही भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची माहितीही व तसा तपशीलही राणेंनी शहा यांना दिला, असेही हे निकटवर्तीय म्हणाले. भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी राणेंच्या पक्षप्रवेशाबाबत कोणतेही ठोस विधान केले नसले तरी, विचारधारेचा ते स्वीकार करत असतील तर त्यांचे पक्षात स्वागतच आहे, असे त्यांनी सांगितले.