मुंबई: सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या २४ तासात १८ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राजकीय नेते मंडळी देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. नारायण राणे यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पुढचे काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहोत, असे राणे यांनी सांगितले आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.
— Narayan Rane (@MeNarayanRane) October 1, 2020
‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून, डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन’, असे ट्वीट केले आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मागील २४ तासात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.६१ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.