नारायण राणे भाजप प्रवेशाचे अहमदाबाद कनेक्शन

0

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींबद्दल नाराज असल्यामुळे ते भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा महिनाभरापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. त्या चर्चेला काल उधाण आले, कारण अहमदाबाद येथे भाजपचे चाणक्य राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे उपस्थित होते. तसेच एका वृत्तवाहिनीने मुख्यमंत्री, राणे आणि आमदार नितेश राणे हे तिघेही एकाच वाहनातून जात असल्याचे दाखवल्याने या चर्चेला अधिक उधाण आले. मात्र याबाबत राणे यांनी खुलासा करत आपण केवळ खासगी कामासाठी अहमदाबाद येथे गेलो होतो आणि तेथे कुणालाही भेटलो नाही. भाजपकडून पक्षप्रवेशासाठी वारंवार विचारणा होते, कारण मार्केटमध्ये चांगला माल असेल, तर सगळेच विचारतात, अशी कोपरखळीही राणे यांनी मारली. असे असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात राणे लवकरच भुकंप घडवून आणतील ही चर्चा सुरूच राहिली आहे.

अमित शाह यांचा एकुलता एक मुलगा जय यांची पत्नी ऋषिता यांनी नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. आजोबा झालेले अमित शाह नातीला पाहण्यासाठी परवा अहमदाबादला आले होते. त्यातच मुख्यमंत्र्यांचा अहमदाबाद दौरा ठरला. फडणवीसांना आपला दौरा गुप्त ठेवला होता. म्हणजेच गुजरात सरकारला याबाबत कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आली नव्हती. या सर्व पार्श्‍वभूमीवर राणे त्याचवेळी अहमदाबादेत उपस्थित होते. त्यामुळे राणे हे भाजपवासी होण्याच्या वृत्ताला अहमदाबाद कनेक्शनने जोरदार हवा मिळाली. राणेंच्या प्रवेशाबाबत अहमदाबाद येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये तासभर चर्चा झाल्याचेही वृत्त येत होती. आज नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करत पक्षांतराच्या वृत्तावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

काल आपण अहमदाबादमध्ये होतो, मात्र कोणालाही भेटलो ग्रँड हयात हॉटेलमध्ये 10.30 माझी वाजता मीटिंग होती. उशीर झाल्याने रात्री हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्यानंतर सकाळी पावणेसात वाजताच्या विमानाने मुंबईला परत आलो, अशी माहिती नारायण राणेंनी यावेळी दिली.

मला भाजपाची जुनीच ऑफर आहे, ते सारखे विचारत असतात. पण मी विचार केलेला नाही. मी त्यांना हो ही बोललो नाही आणि नाहीही बोललो नाही, असे अस्पष्ट उत्तरही राणे यांनी यावेळी दिले. जर पक्ष बदलायचाच असता, तर आधी भेटायला गेलो नसतो, थेट निर्णय घेतला असता. फडणवीस आणि शहांना भेटलो असतो, तर लपून राहिले असते का? असा सवालही राणेंनी यावेळी विचारला. रात्री साडेदहानंतर आण कुठेही जात नाही, त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्‍नच येत नाही. मी अमित शहांच्या घरी गेलो म्हणता, मग तिथून बाहेर पडतानाच वगैरे व्हिडीओ आहे का?, असा उलट सवाल राणेंनी प्रसारमाध्यमांना विचारला.

आरपीआयची ऑफर नाकारून मंत्रीपद गमावले!
मला रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या रिपाईमध्ये येण्यासाठी मला विचारले होते. मात्र, मी नकार देऊन संधी हुकवली, नाहीतर आज केंद्रीय मंत्री असतो, असेही नारायण राणे यांनी यावेळी म्हटले. कालच आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे पत्रकार परिषदेत नारायण राणेसाहेब जो निर्णय घेतील, त्यामुळे काहीचे जीवन घडेल आणि काही जणांचे बिघडेल. या सूचक विधानामुळे राणेंच्या पक्षांतराच्या वृत्ताला जोर आला होता.

फडणवीस, राणे आणि नितेश एकाच गाडीत?
दरम्यान विविध वृत्तवाहिन्यांनी काल अहमदाबाद येथे राणे, मुख्यमंत्री व नितेश राणे हे एकाच वाहनातून जात असतानांची दृश्ये दाखवली. ही दृश्ये खोटी असल्याचे राणे यांनी सांगितले. तसेच जर गाडीतून जातानाची दृश्ये दाखवतात, तर मग मुख्यमंत्री व शहा यांच्या भेटीची दृश्ये का दाखवत नाहीत? असा प्रतिप्रश्‍नही त्यांनी केला.

देशात आणि राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडतात, त्याचाच एक हा प्रकार आहे. भाजपसाठी येणार्‍यांसाठी दारे सदैव उघडी आहेत. महत्त्वाच्या चर्चा केल्यानंतरच ही दारे उघडली जातात.
रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष

राणेंचा भाजपप्रवेश मे महिन्यात?
नारायण राणे यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्‍चित झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. 24 एप्रिल किंवा 1 मे रोजी त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच नारायण राणे यांनी काल अहमदाबाद येथे अमित शहा यांना मेडिकल कॉलेजच्या उद्घघाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही देण्यात आल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली. राणे प्रवेशाबाबत मुख्यमंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत तीन बैठक झाल्या. परंतु या बैठकी दरम्यान वाटाघाटी यशस्वी होवू शकल्या नाहीत. आता मात्र पक्ष प्रवेश निश्‍चित झाला आहे. अंतिम वाटाघाटींवर शेवटची चर्चा अहमदाबाद येथे झाली. दरम्यान करी रोड येथील अरेवा प्रकल्पात नारायण राणे यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी प्रमाणात गुंतवणूक केली. याप्रकरणी त्यांच्यामागे ईडीसह अन्य चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यापासून सूटका करण्यासाठी राणे भाजपच्या वाटेवर जात असल्याचेही सूत्रांकडून समजते.

नारायण राणे यांचा राजकीय प्रवास
1968 साली वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश, चेंबूर शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी. 1985 ते 1990 शिवसेनेचे नगरसेवक, बेस्टचे अध्यक्षपद. 1990-95 प्रथमच विधानसभेवर आमदार. 1990-95 काळात विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद. 1996-99 मध्ये युतीच्या सत्ताकाळात महसूल मंत्री, 1999 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड. 2005 साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली. याच वर्षात काँग्रेसमध्ये प्रवेश. काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी आमदारकीची निवडणूक विजयी. आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री. 2007 साली काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड. 2008 मध्ये काँग्रेसमधून निलंबन. 2009 साली विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण. 2014 साली मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून मंत्रीपदाचा राजीनामा. याच वर्षी विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून राणेंचा पहिल्यांदा पराभव. 2015 सालीही वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतही राणेंचा पराभव झाला. 2016साली विधान परिषदेत काँग्रेसकडून आमदारकी.